–
वाळुंज, ता. नगर दरोडा प्रकरण :
सोन्याचे दागिन्यासह 1 सराईत आरोपी जेरबंद, 2 गुन्ह्यांची उकल,
स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी फिर्यादी श्री. जनार्दन संभाजी हिंगे वय 37, रा. वाळुंज, ता. नगर यांचे घराचा दरवाजा कोणीतरी अनोळखी 7-8 आरोपींनी तोडुन आत प्रवेश करुन फिर्यादी यांचे घरातील लहान मुलांना धरुन चाकुचा धाक दाखवला व घरातील 7,05,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले बाबत नगर तालुका पो.स्टे.गु.र.नं. 851/23 भादविक 395 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.
सदरची घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थागुशा अहमदनगर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन, गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न व अटक करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी घटना घडल्यापासुन स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार भाऊसाहेब काळे, रविंद्र कर्डीले, विश्वास बेरड, पंकज व्यवहारे, देवेंद्र शेलार, संतोष खैरे, संदीप दरंदले, फुरकान शेख, मच्छिंद्र बर्डे, आकाश काळे, रोहित येमुल, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, संभाजी कोतकर, उमाकांत गावडे व अर्जुन बडे अशांची 2 पथके नेमुन अशा प्रकारचे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
पथक दिनांक 30/04/24 रोजी नगर तालुका परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेताना पथकास वाळुंज शिवार, ता. नगर येथील चोरी ही आरोपी नामे प्रशांत चव्हाण रा. चिचोंडी पाटील, ता. नगर याने त्याचे इतर साथीदारांसह केला असुन तो चिचोंडी पाटील गावामधील स्टँडवर बसलेला आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाल्याने पथकाने बातमीतील चिचोंडी पाटील गावातील एसटी स्टँड येथे जावुन शोध घेतला असता बातमीतील वर्णना प्रमाणे 1 संशयीत इसम एसटी स्टँड परिसरात बसलेला दिसला. पथकाची खात्री होताच त्यास शिताफीने ताब्यात घेवून पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) प्रशांत घुमीर चव्हाण वय 23, रा. चिचोंडी पाटील, ता. नगर असे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार नामे 2) लिमलेश देशपांड्या चव्हाण (फरार), 3) ऋषीकेश दिगु भोसले (फरार) दोन्ही 4) आयलाश्या जंगल्याभोसले (फरार) रा. आष्टी, जिल्हा बीड व 5) गणेश दिवाणजी काळे (फरार) तिन्ही रा. वाकोडी, ता. नगर व लिमलेश चव्हाण याचे 3 अनोळखी साथीदारांनी मिळुन केल्याचे सांगितले.
ताब्यातील आरोपी प्रशांत घुमीर चव्हाण याचेकडे इतर काही गुन्हे केले काय या बाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने इतर साथीदार 2) लिमलेश देशपांड्या चव्हाण (फरार) रा. 3) ऋषीकेश दिगु भोसले (फरार) दोन्ही रा. हिवरा पिंपरखेड, ता. आष्टी, जिल्हा बीड, 4) आयलाश्या जंगल्याभोसले (फरार) रा. आष्टी, जिल्हा बीड अशांनी मिळुन नोव्हेंबर 2023 मांडवे, ता. नगर येथील एका घराचे किचनचा दरवाजा तोडुन चोरी केल्याचे सांगितल्याने जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता 1) नगर तालुका पो.स्टे.गु.र.नं. 851/23 भादविक 395 व 2) नगर तालुका पो.स्टे. गु.र.नं. 857/23 भादविक 457, 380 प्रमाणे 2 गंभीर गुन्हे दाखल असुन, 2 गुन्हे उघडकिस आलेले आहेत.
आरोपीकडे गुन्ह्यात चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिने व रोख रकमे बाबत विचारपुस करता आरोपींने त्याच्या वाट्याला आलेले सोन्याचे दागिने हे त्याचे घराचे पाठीमागे असलेल्या शेतात पुरुन ठेवल्याचे सांगितले. पथकाने तात्काळ आरोपीचे चिंचोडी पाटील येथील घराचे पाठीमागे शेतात पुरुन ठेवलेले 35,000/- रुपये किंमतीचे 5 ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ, 35,000/- रुपये किंमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 35,000/- रुपये किंमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 21,000/- रुपये किंमतीचे 3 ग्रॅम वजनाची कानातले व 14,000/- रुपये किंमतीचे 2 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकुण 1,40,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो ताब्यात घेवुन आरोपीस मुद्देमालासह नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा.श्री. संपत भोसले साहेब, पोलीस उपअधीक्षक नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.