अहमदनगर संगमनेर-तालुक्याच्या घारगाव परिसरातील लव्ह जिहाद प्रकरणाचा मुख्य सूत्रधार युसूफ चौघुले यास गजाआड केल्यानंतर रात्री मदत करणार्या दोघांच्याही पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून मुसक्या आवळल्या आहेत. यामुळे अटक केलेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे. तर मुख्य सूत्रधाराची पोलीस कोठडीही 5 ऑगस्टपर्यंत वाढली आहे.
घारगाव परिसरातील महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या 19 वर्षीय तरुणीचे अपहरण करुन गुंगीचे औषध देत तिला मुंबईला नेले होते. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. यातील आरोपींचा पोलीस कसून शोध घेत असताना पीडितेला कारमधून मुंबईला घेऊन जाणारा अमर पटेल (रा. साकूर, ता. संगमनेर) यास पोलिसांनी अटक करून गाडी जप्त केली आहे. तर मुंबईत मदत करणारा आदिल शेख याच्याही मुसक्या आवळल्या असल्याचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.
त्यामुळे प्रत्येक गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपीसह त्यास विविध प्रकारे मदत करणार्यांना देखील आरोपी केले जाते. त्यात मुख्य आरोपीला गाडी पुरवणारे, पळून जाण्यास मदत करणारे, लपवून ठेवणारे, घरात राहायला आश्रय देणारे हे देखील आरोपी असल्याने त्यांनाही अटक केली जाते. त्यानुसार वरील आरोपींना अटक केली असल्याचे वाघचौरे यांनी सांगितले. त्यामुळे मुख्य आरोपीस केवळ ओळख म्हणून, मैत्री म्हणून वरीलप्रकारे वा अन्य कोणत्याही प्रकारे मदत करणार्या तरुणांनी कायदेशीर बाब लक्षात घ्यावी,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.