शेतजमीन नावावर करून देत नाही म्हणून व्यसनाधीन झालेल्या मुलाने वृद्ध पित्याचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याची घटना तालुक्यातील कोऱ्हाळे येथे घडली आहे. जन्मदात्या बापाची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गणपत संभाजी कोळगे (वय ८० वर्षे, राहणार जाधववस्ती, कोऱ्हाळे तालुका राहाता) असे मयताचे नाव आहे. कोऱ्हाळे जाधववस्ती येथे कोळगे कुटुंबीय राहत असून मयत गणपत कोळगे हे आपल्या मुलगा, सून, नातवंडांसोबत राहत होते. त्यांचा मुलगा अनिल हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेला होता. तो नेहमी वडिलांकडे त्यांच्या नावे असलेली जमीन स्वत:च्या नावे करण्याची मागणी करत असे. यामुळे दोघांमध्ये यापूर्वीही अनेक वेळा वाद झालेला होता. परंतु वडील जमीन नावावर करण्यास तयार नव्हते. याचाच राग मनात धरून आरोपीने सोमवारी सायंकाळी वडील गणपत कोळगे यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली. वडील मयत झाल्याचे पाहून तो पसार झाला. मयत गणपत कोळगे यांचा नातू अमोल विश्वनाथ साळवे (रा. कोल्हेवाडी तालुका संगमनेर) यांनी आज मंगळवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून मयताचा मुलगा अनिल गणपत कोळगे (वय ५३ वर्ष) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.