नगर – नुकतेच मध्य रेल्वेच्या वतीने दौंड ते मनमाड हा विभाग सोलापूर विभाग ऐवजी पुणे विभागाला जोडला जाईल असे आदेश रेल्वे बोर्डचे सचिव अरुणा नायर यांनी दिले. येत्या 1 एप्रिल पासून हा 220 किलोमीटरचा रेल्वे मार्ग सोलापूर विभागातून पुणे विभागात समावेश करण्यात येणार आहे.
सोलापूर विभागीय सल्लागार समिती सदस्य बैठकीत समिती सदस्य प्रशांत मुनोत यांनी हा विषय मांडला होता. यापूर्वी देखील अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने सदर विषय वेळोवेळी मांडण्यात आला होता. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासोबत देखील या विषयासंदर्भात चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले होते.
पुणे हा अहमदनगर शहराच्या जवळ फक्त 120 किलोमीटर अंतरावर आहे. सोलापूर हा अहमदनगर पासून जवळपास 300 किलोमीटर लांब असल्याने गैरसोयीचं होते. यापूर्वी रेल्वेचे प्रश्न उपस्थित करण्याकरिता व सोडवण्याकरिता प्रवासी व प्रवासी संघटनांना सोलापूरला जावे लागायचे ते अडचणीचे व गैरसोयीचे असल्याचे मुनोत यांनी सांगितले.
एकूण 22 रेल्वे स्थानक दौंड ते मनमाडच्या दरम्यान पुणे विभागात जोडण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रवाश्यांना होणाऱ्या अनेक गैरसोयी टाळता येणार आहे. या निर्णयामुळे अनेक फायदे होणार आहे. त्यात प्रमुख म्हणजे सामुहिक बुकिंग करिता सोलापूरला जाण्याऐवजी फक्त पुण्याला जावे लागेल. दुसरा अपंग तसेच कन्सेशन प्राप्त करण्याकरिता व्यक्तींना- प्रवाशांना सोलापूरला जावे लागायचे ते आता पुण्यातून काम होणार आहे. सर्वात महत्त्वाच म्हणजे मनमाड ते लोणावळा एकच म्हणजे पुणे विभागात आले असल्याचे हरजितसिंह वधवा यांनी म्हंटले आहे.
अहमदनगर-पुणे इंटरसिटी किंवा शिर्डी पुणे-इंटरसिटी यास पुणे विभाग स्वतःहून इंट्रोड्युस करू शकते आणि ती देखील सुरू करावी. या निर्णयाकरिता अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या निर्णयाचे वधवा, मुनोत, अर्शद शेख, संजय चव्हाण, अशोक कानडे, विपुल शहा, सुनील छाजेड, संजय सपकाळ, संदेश रपारिया, अजय दिघे, संतोष बडे, संजय वाळुंज आदींनी स्वागत केले आहे.
दौंड ते मनमाड रेल्वे मार्ग पुणे विभागाला जोडला जाणार
- Advertisement -