अहमदनगर- जिल्हा सहकारी बँकेत मोठी पदभरती होणार आहे. सातशेहून अधिक जागांची पदभरती यावेळी केली जाणार आहे.मंगळवारी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत बँकेच्या नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समजली आहे.
पुण्यातील वर्क वेल कंपनी ही भरती करणार आहे. संचालक मंडळाची दुपारी बैठक झाली. या भरतीत सातशेहून अधिक जागा भरल्या जाणार असल्याचे समजते. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यास संचालक मंडळाने परवानगी दिली असल्याची माहिती बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी दिली.भरतीसाठी अनेक संस्थांनी बँकेला प्रस्ताव पाठवले होते. आयबीपीएस, टीसीएससारख्या या कंपन्यांचे दर बँकेला परवडत नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतल्याचे समजते.
‘एमकेसीएल’ कंपनीनेही प्रस्ताव दिला होता. मात्र, याही कंपनीची निवड झालेली नाही. निवड झालेल्या कंपनीची काय वैशिष्ट्ये आहेत हे बँक प्रशासनाने जाहीर केलेले नाही.२०१७ साली झालेली भरती गाजली होती बँकेने यापूर्वी २०१७ साली ४६४ जागांची नोकरभरती केली होती. ते काम बँकेने ‘नायबर’ या संस्थेला दिले होते. त्या भरतीत अनियमितता झाल्यामुळे सहकार विभागाने ती भरती रद्द केली होती. उत्तरपत्रिकांत फेरफार झाला, सीसीटीव्ही बंद करून उत्तरपत्रिका तपासल्या गेल्या,
नायबर संस्थेने बँकेच्या परस्पर अन्य एजन्सीची मदत घेऊन ती भरती केली, अकोले तालुक्यातील अनेक उमेदवार भरतीत निवडले गेले, संचालकांचे व अधिकाऱ्यांचे नातेवाईक गुणवत्ता यादीत आले असेही आरोप केले जात होते.याप्रकरणी निवड झालेल्या काही उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने आक्षेपार्ह ६४ उत्तरपत्रिकांची आधुनिक तंत्रज्ञानाने तपासणी करण्यास सांगितले.मात्र, तत्कालीन सहकार आयुक्तांनी स्वतःच्या अधिकारात खासगी एजन्सीकडून उत्तरपत्रिका तपासून घेत हे प्रकरण दडपले असेही आरोप केले जात होते.