Monday, April 28, 2025

अहमदनगर जिल्ह्यात बनावट अपंग प्रमाणपत्र, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दोघांना अटक

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षकांच्या बनावट अपंगत्व प्रमाणपत्रांचे प्रकरण गाजत असतानाच बुधवारी (दि.२७) जिल्हा शासकीय रुग्णालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे व बनावट ओळख सांगून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न उघडकीस आला. मात्र जिल्हा सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा गैरप्रकार टळला.

या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अशोक अर्जुन यादव (रा. निंबारी, बीड) व राहुल संपत आभाळे (रा. मढी खुर्द, कोपरगाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात जिल्हा सरकारी रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक दत्तात्रय झुंबर धाडगे यांनी फिर्याद दिली आहे.

जिल्हा परिषदेतील बदल्यांमध्ये सवलत मिळवण्यासाठी बनावट अपंगत्व प्रमाणपत्र सादर झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यानुसार अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षकांची तपासणी पुण्यातील ससून रुग्णालयातमार्फत केली जात आहे. या बनावट अपंगत्व प्रमाणपत्राचे लागेबांधे, जिल्हा सरकारी रुग्णालयात असल्याचा संशय घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातीलच वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांच्या सतर्कतेमुळे दोघांचा बनावट अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न फसला. रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीच या दोघांना पकडून तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले.

बुधवारी (दि.२७) सकाळी ११.३० च्या सुमारास ही फसवणुकीच्या प्रयत्नाची घटना घडली. अर्जुन यादव व राहुल आभाळे हे दोघे जिल्हा सरकारी रुग्णालयात आले. त्यांनी शुभम सुनील तरटे (रा. गुरव पिंपरी, कर्जत) या नावाने केसपेपर काढला व स्वतः अपंग असल्याची माहिती देत अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून डॉ. गाडे यांच्याकडे आले. डॉ. गाडे यांच्यापुढे अशोक यादव या नावाने आधार कार्ड व कागदपत्रे, फोटो सादर केला. डॉ. गाडे यांनी शुभम तरटे कोठे आहे? अशी विचारणा केली. त्यावर तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला.

त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी अधिक चौकशी केली त्यावर अशोक यादव याने, ‘आमचे चुकले, आम्ही आता असे करणार नाही, आम्ही खोटे प्रमाणपत्र काढण्यास आलो होतो’, असे सांगितले. त्यानंतर डॉ. गाडे यांनी कर्मचारी अमृता गवळी, श्रीमती वाघमारे, दत्तात्रय जठाडे यांना बोलावून घेत चौकशी केली. त्यात बनवेगिरी व रुग्णालयाची दिशाभूल करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न उघडकीस आला. अशोक यादव व राहुल आभाळे या दोघांना तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles