आगामी गणेशोत्सव, ईद ए मिलादसह इतर सण शांततेत साजरे करावेत
– जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
अहमदनगर, – जिल्ह्यात आगामी काळात साजरे होणारे गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद यासह इतर सण निर्विघ्नपणे व शांततेत साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, महापालिका आयुक्त डॉ. यशवंत डांगे, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अमोल भरती यांच्यासह संबंधित विभागांचे विभाग प्रमुख बैठकीस उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की, जिल्ह्यात साजरे होणारे सण, उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करण्याची आपल्या जिल्ह्याची परंपरा आहे. जिल्ह्याची ही परंपरा कायम ठेवत आगामी काळात जिल्ह्यात साजरे होणारे सण, उत्सव हे शांततेत, एकमेकांच्या हातात हात घालून साजरे करावेत. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी पर्यावरण पूरक, संस्कृतीचे जतन करणारे व ध्वनी प्रदुषणमुक्त गणेशोत्सव साजरा करावा. अशा मंडळांना पारितोषिक देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच या सण, उत्सवादरम्यान रस्त्यांची दुरुस्ती, स्ट्रीटलाईट यासह इतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला म्हणाले की, गणेश मिरवणूक मार्ग व विसर्जन स्थळाची पहाणी करण्यात येऊन त्या ठिकाणी असलेल्या समस्यांची सोडवणूक केली जाईल. एक खिडकी योजनेतून गणेशमंडळांना परवानग्या देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश मूर्तीची उंची मर्यादित ठेवावी जेणेकरून मिरवणुकीदरम्यान कुठलाही अडथळा अथवा अपघात होणार नाही. पोलीस प्रशासनामार्फत सीसीटीव्ही कॅमेरे, आवश्यक ठिकाणी बॅरीकेटींग करण्याबरोबरच पेट्रोलिंगही करण्यात येईल. उत्सवादरम्यान काही घटना घडल्यास त्याची माहिती देण्यासाठी डायल 112 चा वापर करावा. या उत्सवादरम्यान मंडळांनी त्यांचे स्वयंसेवक २४ उपलब्ध राहतील याची व्यवस्था करावी तसेच सण शांततेत साजरे होऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी जिल्ह्यात आगामी काळात साजरे होणारे सण, उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले. बैठकीत शांतता समितीच्या सदस्यांनी उपयुक्त अशा सुचना केल्या.