अहमदनग-रजिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या 99 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (सहायक फौजदार) यांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षकपदी (ग्रेड पीएसआय) पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत आदेश काढले आहेत. पोलीस दलामध्ये एकूण 30 वर्षे सेवा पूर्ण केलेले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर किमान तीन वर्षे सेवा पूर्ण केलेले, पोलीस उपनिरीक्षक संवर्ग पदाचे वेतन घेत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात येते.
त्यानुसार नगर जिल्हा पोलीस दलातील 99 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना उपनिरीक्षकपदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तसे आदेश अधीक्षक ओला यांनी दिले आहेत. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यांना नियमित पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती मिळेपर्यंत ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांचीच कर्तव्ये व जबाबदार्या पार पाडतील. तसेच श्रेणी पोलीस उपनिरीक्षक म्हणून संबोधन करण्यात आल्याने त्यांच्या वेतनात कोणताही बदल होणार नाही. शासन निर्णयाप्रमाणे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक म्हणून संबोधीत करण्यात येणार्या अधिकार्यांच्या गणवेशात अतिरिक्त एक स्टार समाविष्ठ करण्यात यावे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक म्हणून संबोधल्या जाणार्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी, नाशिक येथील विहित कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य राहील, असेही आदेशात नमूद केलेले आहे.
दरम्यान, 25 फेब्रुवारी 2022 च्या शासन निर्णयानुसार पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करण्यात आला असून आता पोलीस शिपाई यांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे. त्यांनाही लवकरच पदोन्नती देण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.