मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आंदोलक राज्यात आक्रमक झाले आहेत. राज्यकर्त्यांना मराठा आंदोलक जाब विचारू लागले आहेत. ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. मराठा महिला देखील आंदोलनात उतरल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात एसटी महामंडळाची बस रविवारी सकाळी पेटवली गेली. याचबरोबर बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यात बस गाड्यांना टार्गेट केले जात आहे.
यामुळे नगर विभागातील बीड आणि धाराशिवकडे जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. बीड आणि धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांनी नगर विभागाला पुढील सूचना येईपर्यंत बस फेऱ्या सुरू न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे नगर विभागाच्या बस गाड्या रविवारी दिवसभरात सुमारे 3 हजार 800 किलोमीटरने कमी धावल्याची नोंद झाली आहे.