विस्टीऑन कंपनीकडून बेरोजगार दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव व साहित्य वाटप
स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेकडून कार्यक्रमाचे आयोजन
अहमदनगर- स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पुणे येथील विस्टीऑन कंपनीने जिल्ह्यातील 32 बेरोजगार दिव्यांगाना कृत्रिम अवयवाचे मोफत वाटप केले आहे. या साहित्याची रक्कम जवळपास वीस लाखांच्या वर असून अनेकांना कृत्रिम पाय देऊन त्यांचे जीवन सुसह्य केले, त्यांना जगण्याची नवी उमेद दिली, असे गौरवोद्गार महाराष्ट्र अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे माजी चेअरमन श्री साहेबराव अनाप यांनी काढले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक डॉ. सिद्धार्थ बंगार साहेब, प्रभू राऊत, अंजली जाधव मॅडम, सुभिक्षा एस. मॅडम, अनिकेत चव्हाण, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्यसह कोषाध्यक्ष श्री संतोष सरवदे, या कार्यक्रमाचे समन्वयक उपक्रमशील शिक्षक श्री राजीव शिंदे सर, विष्णू बोडखे, पोपट धामणे, श्रीकांत दळवी, राजेंद्र औटी, बळीराम जाधव आदी अधिकारी उपस्थित होते..
यावेळी पुढे बोलताना साहेबराव अनाप म्हणाले की,विस्टीऑन पुणे कंपनीच्या या शिबिरास सहकार्य करण्याची संधी संघटनेला मिळाली. यापुढेही या कंपनीने दिव्यांगांसाठी असेच भरीव कार्य करावे, संघटना सदैव त्यांच्या मदतीसाठी तत्पर राहील, असे आश्वासित केले.
प्रास्ताविकात श्री संतोष सरवदे यांनी जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी खूप परिश्रम घेऊन या शिबिराचे आयोजन केले व जवळपास जिल्ह्यातील 32 बेरोजगार दिव्यांगांना या कृत्रिम अवयवाचे वाटप करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले.यामध्ये 25 दिव्यांगांना पायाचे तर सात दिव्यांगांना कॅलिपर चे वाटप यावेळी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दिव्यांगानी कृत्रिम पायाने चालून प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा समाधान देणार होता.
कंपनीचे व्यवस्थापक श्री सिद्धार्थ बंगार साहेब यांनी कंपनीला दिव्यांगाची सेवा करण्याची संधी या निमित्ताने मिळाली. कंपनीमार्फत अनेक दिवसांपासून सीआरएस फंड हा दिव्यांगांसाठीच खर्च करण्यात येतो. आजपर्यंत कंपनीने अनेक मोफत कृत्रिम अवयव वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले असून अनेक बेरोजगार दिव्यांगांना जगण्याची नवी उमेद मिळाली. कंपनीचे हे कार्य यापुढे असेच चालू राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी कंपनीचे समन्वयक प्रभू राऊत, अंजली जाधव, अनिकेत चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला लाभार्थी दिव्यांगांसह त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या वतीने त्यांना चहा नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे सचिव श्री पोपट धामणे सर, मिठू शिंदे, राजू आव्हाड, श्रीकांत दळवी, राजीव शिंदे, विष्णू बोडखे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार राजीव शिंदे यांनी मानले.