Saturday, October 5, 2024

आपल्या आयुष्याची किंमत काय ? … नगरमधील डॉ. अमोल जाधव यांनी मांडले भयावह वास्तव

आपल्या आयुष्याची किंमत काय ?

सकाळी नेहमीप्रमाणे हॉस्पिटलला आलो…एक ऑपरेशन असल्याने तडक ओ.टी. मध्ये पोहोचलो… तिथं भूलतज्ज्ञ डॉ. दीपाली फाळके सोबत होत्या… ऑपरेशन चालू असताना त्यांनी विचारले, दिल्लीतील डॉ. अरविंद कुमार यांचा व्हिडिओ पाहिला का? मी ‘नाही’ म्हणालो आणि काम चालू ठेवले…मध्येच त्या पुन्हा म्हणाल्या, खूप भयानक वास्तव डॉ. अरविंद कुमार यांनी मांडलय, आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप चिंताजनक आहे.. मी ऐकले आणि पुन्हा कामात मग्न झालो… ऑपरेशन झालं… नर्सिंग स्टाफला आवश्यक सूचना देऊन ओपीडीत आलो… कॉफी मागवली आणि पेशंट सुरू करण्यापूर्वी उत्सुकता म्हणून कॉफी पिताना डॉ. अरविंद कुमार यांचा ‘तो’ व्हिडिओ पाहिला….७-८ मिनिटांचा तो व्हिडिओ पाहून मुळापासून हादरलो…. आपल्या देशातील भयावह वास्तव त्यांनी मांडलं होतं… डॉ.अरविंद कुमार हे दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये चेस्ट सर्जन म्हणून गेली तीस एक वर्षे प्रॅक्टिस करत आहेत… त्यांनी सांगितले, १९८७-८८ च्या दरम्यान प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा फुफ्फुसाच्या(lung) आजाराचे पेशंट तपासताना बहुतांश पेशंटची फुफ्फुसे गुलाबी रंगाची असायची म्हणजे वैद्यकीय भाषेत सुदृढ असायची… एखाद्याच पेश़टचे काळे ठिपके असलेले फुफ्फुस पहायला मिळायचे… तेही सलग २५-३० वर्षे मोठ्या प्रमाणात सिगारेट, बिडी ओढणाऱ्या (चेन स्मोकर) आणि वयाची पन्नाशी ओलांडलेले…यात महिला, बालके खूप क्वचित असायच्या….
गेल्या काही वर्षांत मात्र हे चित्र अतिशय वेगाने बदलले आहे… आता काळे फुफ्फुस असलेले पेशंट सर्रास आढळतात… फुफ्फुसे निकामी होणे, फुफ्फुसाचा कर्करोग झालेले पेशंट वाढले आहेत… विशेष म्हणजे यात धूम्रपानामुळे फुफ्फुसे खराब झालेले पेशंट जितके असतात तितकेच पेशंट कुठलेही व्यसन नसलेले पेशंट असतात…यात महिला, मुलंही असतात… अगदी वयाच्या तिशीतही अनेकांना फुफ्फुस विकार जडत आहेत… त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो, सतत खोकला असतो… आयुष्याशी त्यांचा सततचा झगडा सुरू असतो… कधी आयुष्याची दोरी सुटेल हे सांगता येत नाही….

हे प्रमाण का वाढलं तेव्हा एक उत्तर मिळाले…ते म्हणजे आपल्याकडे वाढलेले जल वायू प्रदूषण….आपण हवेत जो श्वास घेतो त्यातून अशुद्ध हवा फुफ्फुसात जाते… फुफ्फुसे तरी किती काम करणार…कारण श्वासागणिक किती तरी अति हानीकारक घटक आत येतात… अतिशय कमी वयात फुफ्फुसे कमजोर होतात… लहान मुलांना तर जन्मजात न्यूमोनिया, अस्थमा, COPD असे आजार जडत आहेत…. मनुष्य १०० वर्षे जगू शकतो असे म्हणतात पण आज विज्ञान युगात हे प्रमाण ४०-५० वर्षे इतकं खाली आलं आहे ‌…. दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीत आरोग्याचं हे भयानक वास्तव चिंता करायला लावणारं आहे….

एखाद्या चेन स्मोकरला दिवसात 25 सिगारेट, बिडी ओढल्यावर जितके इन्फेक्शन होते, जवळपास तितकेच इन्फेक्शन नवजात बाळाला दिवसभरात फक्त श्वास घेतल्याने होते. इतकी हवा प्रदूषित झालेली आहे. मध्यंतरी दिल्लीत गेलो असता मी स्वत: या दूषित हवेचा अनुभव घेतला. दुपारी बारा वाजले तरी सूर्य दर्शन नाही..थंडी नसूनही धुक्यासारखी परिस्थिती…चौकशी केली तर समजले आज शाळांना सुट्टी दिली आहे…रस्तो रस्ती दिल्ली सरकारच्या पाण्याच्या गाड्या फिरतायत…हवेत पाण्याचे फवारे उडवून धूलिकण जमिनीवर आणण्याचा प्रयत्न चालू आहे. राजधानीत आता हे चित्र नेहमीचच झाले आहे आणि सर गंगाराम हॉस्पिटलमधील फुफ्फुसाचे आजार असलेल्यांच्या रांगाही तितक्याच वेगाने वाढत आहे.
आपल्याला वाटेल दिल्ली अपनेसे बहुत दूर है. पण आपण काही दिवसांच्या बातम्या पाहिल्या असतील तर आपल्या राज्याच्या राजधानीत मुंबईतही अशीच परिस्थिती निर्माण होत आहे. मुंबईत हवेतील प्रदूषणामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी तेथिल महानगरपालिका करीत आहे…
एक डॉक्टर म्हणून या गोष्टी खूप विचार करायला लावणाऱ्या आहेत. शुध्द हवाच शरीरात गेली नाही तर आधुनिक वैद्यक शास्त्र तरी किती उपयोगी पडणार असा प्रश्न पडतो. आपण आपला जवळचा कोणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यावर त्याला आयुष्य मिळावं यासाठी प्रचंड धडपड करतो. डॉक्टरांना सांगतो, कितीही पैसे लागू द्या, आमच्या माणसाला वाचवा. आय.सी.यु.मध्ये ठेवा, महागडे इंजेक्शन द्या, औषधे द्या…पण पेशंटचे आयुष्य वाढवा…
आजारी पडल्यावर आपण खूप सिरीयस होतो. परंतु इथं जल वायू प्रदूषणामुळे आपण रोजच आयुष्यातील एक एक दिवस स्वत:च नकळतपणे कमी करीत आहोत याचा विचार कोणी करायचा…
सरकारकडून आपण फक्त हे फुकट मिळावे, ते फुकट मिळावे अशी अपेक्षा ठेवायची. राजकारणीही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अन्नधान्य फुकट, वीज मोफत, गॅस निम्म्या किंमतीत, बस प्रवास मोफत, तुमच्या नावे दरमहा मदत बँकेत जमा, कर्जमाफी अशा लोकप्रिय घोषणा देतात. मतदारही तेवढ्या पुरता विचार करून जो जास्त रेवड्या वाटेल त्यांना साथ देतात. भौतिक गोष्टी आम्हाला मोफत हव्यात. पण निसर्गाने मोफत दिलेल्या व जीवनासाठी अत्यावश्यक असलेल्या हवेची आम्ही प्रदूषण करून गुणवत्ता नाहीशी केली आहे.

पण प्रदूषणामुळे निर्माण होणारा आरोग्याचा प्रश्न किती गंभीर आहे याचा विचार केला पाहिजे. लोकांनी सरकारमधील मंडळींना सांगितले पाहिजे, आम्हाला विकास हवा, रोजगार हवा, स्वाभिमानाने जगण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म द्या….आणि सर्वात महत्वाचे जल वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपाय करा. शुध्द हवा, शुध्द पाणी मिळाले तरच आताची आणि पुढच्या अनेक पिढ्या निरोगी आयुष्य जगू शकतील. शेवटी सिर सलामत तो पगडी पचास म्हणतात ते उगीच नाही…तुम्हीच प्रदूषणामुळे जगला नाही तर कितीही विकास झाला तरी त्याचा फायदा काय होणार…शतकातून येणाऱ्या कोविड सारख्या महामारीतून आपण जगलो. आपला देश वाचला म्हणून आपण स्वत:चेच कौतुक करून घेतो. पण दररोज जगताना मरणाला जवळ आणतोय त्याचे काय ? आपल्या देशात सगळा विकास होतोय पण पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे दुर्लक्ष होतय हे वास्तव आहे. हे ऱ्हास पर्व थांबले पाहिजे अन्यथा विनाश अटळ आहे…

– डॉ. अमोल जाधव
स्त्री रोग तज्ज्ञ
सरस्वती हॉस्पिटल, नगर

(साभार – फेसबुक)

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles