आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्यांचे धोरण राबवले जात असून राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाच्या गृह विभागाने आज, बुधवारी रात्री काढले. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांसह श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या जागी ठाण्याचे पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांची बदली झाली आहे. कराळे यापूर्वी नगरला उपअधीक्षक होते. श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांची छत्रपती संभाजीनगर लोहमार्गकडे पोलीस अधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी लातूरचे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य वैभव कलुबर्मे यांची नियुक्ती झाली आहे. शिर्डी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या जागी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांची बदली झाली आहे. मिटके यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नाही. मिटके यांनी यापूर्वी नगर शहर व श्रीरामपूरचे उपअधीक्षक म्हणून काम पाहिले आहे.