अहमदनगर -अल्पवयीन मुलांना लोखंडी रॉड, लोखंडी कोयता, कुर्हाडीच्या दांडक्याने मारहाण करून त्यांची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढण्यात आलेल्या घटनेची गंभीर दखल पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घेतली. त्यानंतर चौघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशाल जालिंदर काटे (वय 27), विशाल दीपक कापरे (वय 22), हर्षद गौतम गायकवाड (वय 20, तिघे रा. नवनागापूर) व प्रवीण शरद गिते (वय 24 रा. गिते वस्ती, विळदघाट, ता. नगर) अशी त्यांची नावे आहेत.
13 जणांविरूध्द गुन्हा दाखल असून उर्वरित संशयित आरोपी पसार झाले आहेत. नवनागापूर परिसरात राहत असलेल्या अल्पवयीन मुलांच्या घरी काही तरुण सोमवारी (24 जून) दुपारी गेले होते. मारण्याची सुपारी घेतल्याच्या रागातून त्यांनी त्या मुलासह त्याची आई, आजी व अल्पवयीन मित्राला रॉड, कोयता, दांडक्याने मारहाण केली. त्यांच्या आणखी एका मित्राला मारहाण करण्यात आली. अल्पवयीन मुलाच्या शेजारी राहणार्या महिलेला देखील ‘तुझा मुलगा कुठे आहे’, असे म्हणून अत्याचार करून मारून टाकण्याची धमकी दिली. त्या तरूणांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांना अज्ञातस्थळी घेऊन जात पुन्हा रॉड, कोयता, दांडके, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करून धमकी दिली. त्यांच्या अंगावरील कपडे उतरून त्यांची धिंड काढली.
मारहाणीत हातापायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. मारहाणीचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यात आले. मारहाणीत जखमी झालेल्या अल्पवयीन मुलांच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले असता तेथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी या घटनेची दखल घेतली नाही. जखमींची फिर्याद नोंदवून घेतली नाही. त्यांना रुग्णालयात जाण्यास सांगितले. दरम्यान, दुसर्या दिवशी (मंगळवारी) पोलीस अधीक्षक ओला यांनी या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर अल्पवयीन मुलाच्या जबाबावरून 13 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील चौघांना अटक करण्यात आली असून उर्वरित संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घडलेला प्रकार गंभीर आहे. गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली असून उर्वरित संशयितांनाही लवकरच अटक केली जाईल. गुन्हा दाखल करून घेण्यास विलंब झाल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना नोटीस बजावण्यात येणार असून खुलासा मागितला जाईल. ते दोषी असल्यास कारवाई केली जाईल.
– पोलीस अधीक्षक राकेश ओला