नगर: राज्यातील ग्रामसेवक संवर्गाचे एकमुखी नेतृत्व एकनाथ ढाकणे यांना कराड (जि. सातारा ) येथे झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते किरण माने, विचारवंत प्राचार्य यशवंत पाटणे, हिंदकेसरी अप्पासाहेब कदम यांच्या हस्ते स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या ‘प्राईड ऑफ स्पंदन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साहित्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल ढाकणे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
एकनाथ ढाकणे अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमन असून ग्रामसेवक संघटनेचे माजी राज्य अध्यक्ष आहेत. ग्रामसेवा संदेश या दीपावली अंकाचे संपादक म्हणून त्यांनी दरवर्षी दर्जेदार दीपावली अंक प्रकाशित केले आहे. शैक्षणिक क्षेत्रातही ते योगदान देत असून ढाकणे शैक्षणिक संकुलचे अध्यक्षपद भूषवत आहेत. सेवा काळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कारही जाहीर झाला आहे.
एकनाथ ढाकणे यांनी स्वकर्तृत्वावर शेवगाव पाथर्डी सारख्या ग्रामीण भागात उच्च तंत्र शिक्षणाची सोय करून हजारो विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य चालवले आहे. एका छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होत आहे. त्याचबरोबर ग्रामसेवक म्हणून गेले 35 वर्ष ‘एकच ध्यास गावचा विकास’ यानुसार सर्व समावेशक कार्य करून अनेक नागरिकांना यशस्वी मदत केलेली आहे. त्यांना वैयक्तिक कामाबद्दल आणि सामूहिक ग्रामपंचायत कामाबद्दल अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. ग्रामविकास चळवळ आणि आध्यात्मिक सेवा याची एकत्रित सांगड घालून महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्यांची नगर ते पंढरपूर ग्रामसेवक प्रबोधन दिंडीचे यशस्वीरीत्या आयोजन ते करत असतात. दिंडीच्या माध्यमातून परमार्थ सेवा हीच जनसेवा हे मनमनात बिंबवले आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याचं कार्य सुद्धा गेले पाच वर्ष ग्रामसेवक प्रबोधन दिंडीच्या माध्यमातून ढाकणे यांच्या प्रेरणेतून होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात ग्रामसेवक चळवळी बरोबर ग्रामसेवक सोसायटी पतसंस्था आज महाराष्ट्रामध्ये कर्मचारी चळवळीमधील अग्रगण्य पतसंस्था आहे . ग्रामसेवकांना साहित्याची ओढ लागावी, गोडी निर्माण व्हावी, नवोदित लेखकांचं कवींचे साहित्य प्रकाशित व्हावं, महाराष्ट्र शासनाच्या निर्णयांची माहिती जनतेपर्यंत जावी तसेच ग्रामसेवकांना खुलं व्यासपीठ ग्रामसेवा संदेश मासिक आणि त्याचा दीपावली अंक या द्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा अंक गेले १७ वर्षे महाराष्ट्रामध्ये आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोफत स्वरूपात वितरण केलं जात आहे. सर्व समावेशक साहित्याचे खुले व्यासपीठ म्हणून या मासिकाची ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. स्पंदन साहित्यिक पुरस्काराने गौरव झाल्याबद्दल झाल्याबद्दल एकनाथ ढाकणे यांचे अनेक मान्यवर, संघटना पदाधिकारी , ढाकणे शैक्षणिक संकुल मधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ट्रस्टी यांनी अभिनंदन केले आहे.