Saturday, December 9, 2023

अहमदनगर जिल्ह्यात ग्रामसेवकास मारहाण, न्यायालयाने दिला हा निकाल

अहमदनगर-सरकारी कामात अडथळा आणूून ग्रामसेवकाला मारहाण करून कोंडून ठेवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी 3 महिने सश्रम कारावास व 20 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे.

दत्तात्रय विठ्ठल गोंदके (रा. करंडी, ता. अकोले) असे आरोपीचे नाव आहे. करंडी येथील ग्रामपंचायतीमध्ये जाऊन दत्तात्रय गोंदके याने ग्रामसेवक सोमा मुरलीधर येडे यांचेकडे माहिती घेण्यासाठी एक अर्ज करू लागला. तेव्हा ग्रामसेवकाने त्यास सांगितले की, रोजगार हमी योजनेची शिवार फेरी सर्वे करण्यासाठी जायचे आहे तिकडून आल्यानंतर माहिती देतो, तेव्हा दत्तात्रय गोंदके याने आत्ताच्या आत्ता माहिती द्या, नाही तर तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही, असा दम दिला व लगेच बाहेर जाऊन ग्रामपंचायत कार्यालयाचा दरवाजा लावून घेत ग्रामसेवकाला कोंडले. त्यानंतर दोन तासांनी दरवाजा उघडल्यानंतर ग्रामसेवक बाहेर पडू लागताच गोंदके याने ग्रामसेवकाला छातीत लाथ मारून खाली पाडले व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणला.

याप्रकरणी ग्रामसेवक सोमा येडे यांनी अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दत्तात्रय गोंदके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सदर खटल्याचा तपास करून अकोले पोलिसांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. संगमनेर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सदर खटला चालला.

सदर खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी सरकारपक्षातर्फे प्रबळ युक्तीवाद केला. दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर व आरोपी दत्तात्रय विठ्ठल गोंदके याच्याविरुद्ध गुन्हा शाबीत झाल्याने सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी आरोपीस 3 महिन्यांचा सश्रम कारावास व 20 हजार रुपये द्रव्यदंड शिक्षा सुनावली आहे.

खटल्याच्या सुनावणीच्यावेळी सरकारी वकीलांना पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण डावरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती नाईकवाडी, महिला पोलीस कॉन्स्टेबल दीपाली दवंगे, नयना पंडित, प्रतिभा थोरात यांनी सहकार्य केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d