Saturday, January 18, 2025

हिंद सेवा मंडळ सारडा महाविद्यालय भूखंड प्रकरण…धर्मदाय कार्यालयाकडे तक्रार

हिंद सेवा मंडळ, सारडा महाविद्यालयाच्या भूखंड विक्री प्रकरणावर आक्षेप घेत धर्मदाय कार्यालयाकडे किरण काळेंनी दाखल केली तक्रार
—————————————————-
प्रतिनिधी : हिंद सेवा मंडळ सारडा महाविद्यालयाच्या सुमारे चार एकर मोक्याच्या ठिकाणी असणारे सुमारे २२५ कोटी रुपये मूल्य असणारा भूखंड हा भूखंड माफियांच्या घशात घातला जात असल्याचा आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काल पत्रकार परिषदेत केला होता. काळे यांच्यासह ब्रिजलाल सारडा, शामसुंदर सारडा, विष्णू सारडा, मधुसूदन सारडा, राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक मकरंद खेर सर, अनंत देसाई यांनी देखील या प्रकरणाला लेखी पत्राद्वारे विरोध केलेला आहे. मंगळवारी जाहीर केल्याप्रमाणे काळे यांनी बुधवारी सकाळीच धर्मदाय कार्यालय, अहमदनगर यांच्याकडे हरकत घेऊन या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. याची प्रत राज्याचे सह धर्मदाय आयुक्त, पुणे तसेच राज्याचे धर्मदाय आयुक्त यांना देखील त्यांनी पाठविली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. काळे यांनी तक्रारी समवेत उपलब्ध पुरावे देखील दाखल केले आहेत.

काळे म्हणाले की, सारडा महाविद्यालय, हिंद सेवा मंडळ वाचले पाहिजे. तक्रार माझी एकट्याची नसून शहरातील नामांकित प्रतिष्ठित प्रामाणिक आणि निर्भीड कुटुंबाची त्याचबरोबर एका आदर्श शिक्षक आणि सामाजिक राजकीय चळवळीत काम करणाऱ्या नेत्याची देखील आहे. हिंद सेवा मंडळ वाचावे ही यामागे माझी आणि शहर काँग्रेसची प्रामाणिक भूमिका आहे. कदाचित अनेकांचे आर्थिक हितसंबंध आणि त्याचे नुकसान यामुळे होणार असल्यामुळे माझ्यावर चारित्र्यानं करणारे खोटे, नाटे आरोप केले जातील. मात्र अशा आरोपांना मी भीक घालत नाही. नगरकर जनतेला मी कसा आहे आणि या आरोपांचे जे खरे बोलविते धनी आहेत ते कसे आहेत हे माहीत आहे.

काळे यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे की, १९१३ साली स्थापन झालेले हिंद सेवा मंडळ ही भारतातील अग्रणी शैक्षणिक आणि सामाजिक संस्था आहे. या संस्थेला १९६४ साली सय्यद हाजी हमीद तकिया ट्रस्ट यांनी 99 वर्षांच्या कराराने त्यांची सावेडी रस्त्यालगत असलेली सुमारे ४ एकर जागा शैक्षणिक उपयोगासाठी भाड्याने दिली. आज अखेर ही जागा हिंद सेवा मंडळाच्याच ताब्यात असून करार पूर्ण होण्यास अद्याप ४० वर्षे बाकी आहेत. तकिया ट्रस्टने ही जागा लुनिया – मुनोत यांच्या भागीदारी फर्मला १९९५ मध्ये विकली. परंतु न्यायालयाने २००६ मध्ये मंडळा विरोधात केलेला दावा फेटाळून लावला. हिंद सेवा मंडळाचा जागेवरील कब्जा आणि हक्क आजही कायम केला.

माजी आ. अरूण जगताप आणि हर्षल संतोष भंडारी यांनी हिंद सेवा मंडळाला एक पत्र दिले. लुनिया – मनोत ही फर्म हिंद सेवा मंडळाच्या ताब्यात 99 वर्षांसाठी असलेली जागा जगताप आणि भंडारी यांना विकायला तयार असून हिंद सेवा मंडळाने या जागेवरील ताबा सोडावा, अशी मागणी जगताप – भंडारी यांनी केली आहे. सदर जागेचा ताबा जगताप आणि भंडारी यांना देण्याबाबत हिंद सेवा मंडळाच्या कार्यकारी समितीमधील काही धंदेवाईक पदाधिकारी यांना हाताशी धरून ३ जानेवारी २०२४ रोजी ठराव केलेला आहे. तसेच दहशतीने आणि गैरमार्गाने संस्थेच्या २१ जानेवारी २०२४ रोजी बोलावण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अजेंडा मधील ठराव क्र.२ नुसार या भूखंड दरोड्याला सभेची मान्यता घेण्याचे नियोजन आपले कर्तव्य स्वार्थासाठी सोयीस्करपणे विसरलेल्या विश्वस्तांनी केले असल्याचे काळे यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.

धर्मदाय कार्यालयाचे अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांकडे काळे यांनी लक्ष वेधले असून यामध्ये म्हटले आहे की, आजमितीस मंडळावर कुठलाही कर्जाचा मोठा बोजा किंवा अन्य मार्गाने फेडता येणार नाही असे कुठलेही देणे नाही. कुठलेही संयुक्तिक कारण नसताना ताब्यात पुढील ४० वर्षांसाठी निर्वेधपणे असलेली ट्रस्टची मालमत्ता भूखंड माफियांना देण्याचा त्यांच्या पदाधिकारी अथवा विश्वस्तांना कोणताही अधिकार आणि औचित्य नाही. केवळ व्यक्तिगत स्वार्थी आर्थिक फायद्यासाठी मंडळातील या भूखंड माफियांचे एजंट बनलेले पदाधिकारी या ट्रस्टच्या ताब्यातील जमिनीचा ताबा भूखंड माफियांना देत आहेत. संस्थेच्या संस्थापक मंडळाची दृष्टी आणि व्यापक उद्दीष्टे, संस्था – समाज आणि विद्यार्थी हित यांचा विचार करून या प्रकरणात धर्मदाय कार्यालयाने त्वरीत हस्तक्षेप करावा, अशी मागणी काळे यांनी आपल्या पत्रात केली आहे.

तकरीत पुढे म्हटले आहे की, येत्या २१ जानेवारी रोजी या जागेचा ताबा जगताप – भंडारी यांना देण्यासाठी बोलाविण्यात आलेली हिंदसेवा मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेत या वादग्रस्त विषयावर कोणताही ठराव न करण्याबाबत आपण आदेश द्यावा. या सर्व गैरव्यवहाराची आपण निष्पक्ष चौकशी करावी. संस्थेच्या हित आणि उद्दिष्टांच्या विरोधात जाऊन संस्थेच्या ताब्यातील सार्वजनिक मालमत्ता व्यक्तिगत स्वार्थासाठी भूखंड माफीयांना देणारे विश्वस्तांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. संस्थेच्या मालमत्तेचा असा बाजार मांडणाऱ्या धंदेवाईक पदाधिकारी यांना कायदेशीर प्रक्रिया राबवून त्यांची पात्रता सिद्ध करण्यास सांगावे. त्यांच्या आजवरील संस्था व्यवहारांची चौकशी करण्यात यावी.

सभासद घोटाळ्याची चौकशी करा :
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, यासंदर्भात सर्व कर्मचारी – शिक्षक – प्राध्यापकांची दहशतीने संमती घेण्यात आलेली आहे असे समजते. वास्तविक श्री. सुनीलजी रामदासी यांच्यासारख्या माजी मानद सचिवांनी या लोकशाही विरोधी निर्णयाला विरोध नोंदविला होता असे समजते. सर्व समाजाची अशी धारणा आहे की, सध्याच्या भूखंड घोटाळ्याला या सर्वसामान्य सभासदांनी विरोध करू नये म्हणूनच भूखंड माफीयांनी सर्व कर्मचारी सभासदांना मंडळाच्या कारभारातून बेदखल केले. आपल्या अनैतिक स्वार्थी उद्दिष्टांसाठी वर्तमान कार्यकारी मंडळाने आपल्या नात्यातील, संपर्कातील लोकांना हिंद सेवा मंडळाचे सभासदत्व दिले आहे. वस्तुतः त्यांचा शिक्षण क्षेत्राशी अथवा सामाजिक क्षेत्राशी कुठलाही सिद्ध संबंध नाही.या सभासद घोटाळ्याची चौकशी आपण तातडीने करावी. तसेच या संस्थेचे सभासदत्व सर्व सुजाण आणि प्रामाणिक नागरिकांसाठी, खुले करावे ही नम्र विनंती.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles