सोशल मिडीयावर सुपारीबाज व बारा + मातीचे अशा बॅनरबाजीचे वॉर आ. रोहीत पवार व पक्ष सोडून गेलेल्याकडून प्रत्युत्तर
जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
जामखेड – विधानसभा निवडणुक जशी जवळ येऊ लागली तसतसे कर्जत जामखेडमध्ये अनेक इच्छुक आपले महत्त्व पटवून देण्यासाठी पक्षात पाच वर्षांत झालेली घुसमट बाहेर काढून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदपवार गट) सोडून जात आहे. राजकीय पक्षाची संख्या वाढत असल्याने अनेकांना सवतासुभा मांडण्याची संधी मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आ. रोहीत पवार यांनी सुरवातीला सुपारी + बाज चिन्ह दाखवून पक्षातून गेलेल्यांची हवा टाईट करण्याचा प्रयत्न केला. आता त्याच आ. रोहीत पवार यांच्या बॅनरला धरून विरोधकांनी 12+ माती = ऊ.प.रा. व पुढील अपडेट टाकून जशाचा तसे उत्तर दिले आहे. सोशल मिडीयावर रंगणाऱ्या या बॅनरवॉर मुळे कार्यकर्त्यात मात्र अस्वस्थ झाले आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप हे दोन मोठे राजकीय पक्ष आहेत.
दोन अडीच वर्षांत राज्याच्या राजकारणात मोठी घडामोडी घडल्या अगोदर शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फुट पडली व या दोन राजकीय पक्षाचे चार पक्ष झाले यामुळे मुळ पक्ष व फुटून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे व अजित पवार राज्यात सत्ता भोगतात पण यांना मानणारे ग्रामीण भागात कार्यकर्ते असल्याने ते त्यांच्याकडे जाणार हे मात्र निश्चित व विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर हे घडणारच असते नेत्यांनी हे सहन करायचे असते.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे तसतसे मतदारसंघात वातावरण गरम व्हायला लागले आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वात जास्त गळती कर्जतमधून होऊ लागली. कर्जत मधून बापूसाहेब नेटके यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून तालुकाध्यक्ष पदरात पाडले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनिषा गुंड व त्यांचे पती माजी जि.प.स.राजेंद्र गुंड, प्रा. सचिन गायवळ, संध्या सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटात उडी मारली तर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांनी या सर्वांच्या अगोदर दिड दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच कर्जत मधील दुसरे मातब्बर परमवीर पांडुळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
कर्जत मधील मातब्बर नेते पक्षातून बाहेर पडत होती पण याचे गांभीर्य आ. रोहीत पवार यांनी घेतले नाही.
यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे नेते अँड. कैलास शेवाळे यांनी कर्जत जामखेड कार्यकर्त्यांची मोट बांधून मतदारसंघ कॉंग्रेसला सोडावा अशी मागणी पक्षश्रेष्ठीकडे केली. तसेच शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम यादव यांनी शिवसेना (ऊबाठा) गटाची बैठक घेऊन मतदारसंघ शिवसेनेला सोडावा अशी मागणी केली.
यानंतर जामखेड मधून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात यांनी पक्षबदलाचा निर्णय घेतला. पक्ष सोडून जाणारे व महाविकास आघाडीने केलेली मतदारसंघाची मागणी यामुळे आ. रोहीत पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात 12 आँगस्ट रोजी रात्रीच्या वेळी एक निनावी फ्लेक्स लावला त्यामध्ये कर्जत जामखेड समाचार लवकरच घेऊन येत आहे सुपारी + बाज असे चित्र टाकून पुढील अपडेट 16 आँगस्टला या फ्लेक्सने राजकीय व सामाजिक क्षेत्रात खळबळ माजली. सुरवातीला सदर फ्लेक्स मनसे नेत्याविरोधात लागल्याचा समज झाला पण त्याचा उलगडा कळत नकळत कर्जत बाजार समितीचे संचालक अँड. हर्ष शेवाळे यांनी केला.
आ. रोहीत पवार यांचे फ्लेक्स दोन चार दिवसाला लागत गेले त्यामुळे त्यांना सोडून जाणारे नेतेमंडळी यांनी आम्ही तुम्हाला 2019 ला निवडून आणले त्यावेळी सुपारीबाज नव्हतो का ? असे बोलून आ. रोहीत पवार यांच्या विरोधात एकच उमेदवार द्यायचा याची मोट बांधण्याचा प्रयत्न चालू केला. आ. पवार यांनी मिरजगाव, जामखेड व पाटेगाव (कर्जत) येथे उद्घाटन, भुमीपूजन, रक्षाबंधन तसेच कार्यकर्ता मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन करून अनेक जण सोडून गेले तर जनता माझ्याबरोबर आहे हे दाखवून दिले.
यानंतर आता दोनच दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर त्यांचा एक बॅनर झळकतोय यामध्ये सोडून जाणा-यांना उद्देशून नाराज कशामुळे आहे ते लिहले यामध्ये टेंडर दिले नाही, फाजील लाड न पुरवल्यामुळे, स्वताचे टॅंकर न लावल्याने,थेट सामान्य लोकाना भेटलो, थेट लोकांपर्यंत योजना पोहचल्याने, नवरदेवासारखे गाडीत न फिरवल्याने, आधीसारखी मनमानी चालू न दिल्याने, सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी राहील्याने, सगळीकडे भाषण ठोकायला न मिळाल्याने, आता तर कोणाचे नाव न घेताही सुपारीबाज शब्द ऐकून झाले, व शेवटी केले असते या सुपारीबाजांचे लाड तर नेहमीप्रमाणे हेच झाले असते मस्त असा फ्लेक्स मतदारसंघात सोशल मीडियावर फिरत आहेत.
आ. रोहीत पवार यांच्या या बॅनर वॉरला 12+ माती = ऊ.प.रा. कर्जत जामखेडचा एकच नारा प्रत्येक गोष्टीचे बॅनरबाजी करणारा उपरा हवा कशाला स्वाभिमानी भुमीपुत्र व बॅनरवर टेंडर दिले फक्त 12+ मातीला फाजील लाड फक्त, टॅंकर लावले फक्त, थेट भेटला फक्त, नवरदेवाच्या परण्यात ( मिरवणूकीला) कलावरे, बॅन्ड, मांडव, आचारी, देवबाप्पा फक्त, कर्जत-जामखेड मध्ये मनमानी फक्त, सामान्य कार्यकर्ता कर्जत जामखेडचे पाठीशी फक्त, भाषण ठोकायला फक्त, स्वताच्या आँफीसमध्ये पाच पन्नास कामाला फक्त, शे पाचशे पिए फक्त, इव्हेंट मॅनेजमेंट फक्त, डोक्यावर घेऊन जयजयकार करणार कर्जत जामखेडचे मलिदा खाणार फक्त अशा प्रत्येकापुढे 12+ मातीचा उल्लेख केलेला पोस्ट फिरत आहेत.
या दोन्ही फ्लेक्समुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात चविष्ट चर्चा होत आहे.