अहमदनगर – जिल्हा परिषदेमध्ये नुकतीच केंद्र प्रमुख पदोन्नती प्रक्रिया पार पडली.या पदोन्नती प्रक्रियेच्या निमित्ताने हिंदी साहित्य संमेलन अलाहाबाद या संस्थेच्या बोगस शिक्षा विशारद पदव्यांचा विषय ऐरणीवर आला.
जिल्हयातील अनेक शिक्षकांनी अशा विनासायास तीस चाळीस हजारात मिळणाऱ्या पदव्या पदरात पाडून घेतल्या. या बोगस पदव्यांच्या सेवा पुस्तकात नोंदी केल्या आहेत.पदवीधर शिक्षकांना पाच वर्षात बी एड पूर्ण करण्याची अट होती.अनेक शिक्षकांनी याच बोगस पदव्या सेवा पुस्तकात नोंदवल्या आहेत व शासनाचे लाभ निरंतर घेत आहेत.वास्तविक अशा शिक्षकांनी पाच वर्षात बीएड केले नाही म्हणून त्यांची पदावनती करणे अपेक्षित असताना तसे न होता उलट अशा शिक्षकांनी पदवीधर पदाची वरीष्ठ वेतन श्रेणी पदरात पाडून घेतली आहे.याच वेतन श्रेणीच्या आधारावर ७ वा वेतन आयोग आणि मुख्याध्यापक पदाची वेतन श्रेणीचा लाभ संबंधीत शिक्षक घेत आहेत.यामुळे आशा शिक्षकांची भविष्यात वसुली निघू शकते.
सदर पदवीच्या आधारे पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ घेणारे काही शिक्षक मुख्याध्यापक हे निवृत्त देखील झाले आहेत.2004 पर्यंत ही पदवी वैध होती.परंतु 2004 नंतर सदर संस्थेने हा अभ्यासक्रमच बंद केल्यामुळे 2004 नंतर दिल्या गेलेल्या सर्व पदव्या बोगस आहेत.
अशा या बोगस पदव्यांच्या आधारे पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ घेणारे जे कोणी असतील ते सर्व शिक्षक यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे त्यांना अतिप्रदान झालेली रक्कम वसूल करणे गरजेचे आहे तसेच खोटी पदवी धारण करून आर्थिक लाभ घेतल्याबद्दल त्यांच्यावर शासन नियमानुसार कारवाई देखील अपेक्षित आहे. या संदर्भात जिल्ह्यातील काही शिक्षक संघटना अशा शिक्षकांवर कारवाई होऊ नये म्हणून प्रशासनावर दबाव आणत असल्याचे समजते.मात्र जे चूक आहे त्याबाबत योग्य ती शहानिशा होऊन कारवाई होणे गरजेचे आहे.कारण या बोगस पदव्यामुळे मूळच्या पदव्या मिळविणाऱ्या शिक्षकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे सदर शिक्षा विशारद पदव्या धारण करणाऱ्या शिक्षकांकडून आर्थिक वसुली करण्याबरोबरच खोटी पदवी घेऊन शासनाची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. प्रशासनाकडून या संदर्भात दिरंगाई झाल्यास अथवा योग्य न्याय न मिळाल्यास सदर प्रकरणी सामाजिक संस्था किंवा वैयक्तिक काही शिक्षक हे न्यायालयात जाणार असल्याची चर्चाही तालुक्यात होत आहे.
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांच्याकडे देखील तक्रारी करण्यात आलेल्या आहेत.ते याबाबत काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बोगस पदव्यांचे श्रीगोंदा कनेक्शन
हिंदी साहित्य संमेलन अलाहाबाद या संस्थेच्या शिक्षा विशारद या बी एड समकक्ष पदवीचे वितरण श्रीगोंदा तालुक्यातही मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचे चर्चेत आहे.2005 ते 2015 या दरम्यान श्रीगोंदा तालुक्यात कार्यरत असणारे एक गटशिक्षणाधिकारी या पदव्यांचे एजंट म्हणून काम करीत होते.त्यांनी अनेक शिक्षकांना ही पदवी घेण्यास भाग पाडले.त्यातून त्यांना देखील आर्थिक लाभ होत होता.पदवी घेऊन तातडीने तिच्या नोंदी देखील सेवा पुस्तकात करण्यात आल्या तसेच त्यांना वेतनश्रेणी देखील लागू करण्यात आली. प्रशासनातील एक जबाबदार घटक आपल्या पाठीशी असल्याने त्यावेळी अनेक शिक्षकांनी श्रीगोंदा व्हाया कर्जत ते येवला असा प्रवास करून या पदव्या मिळविल्या आहेत. त्यामुळे 2005 नंतर ज्या ज्या लोकांकडे या पदव्या आहेत अशा जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी कर्जत,श्रीगोंदा तालुक्यातून करण्यात आली असून यासंदर्भात एका शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे देखील पुराव्यासह तक्रार केली आहे तसेच राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्याकडे ही याबाबत तक्रार दाखल करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा प्रश्न आता ऐरणीवर येणार असे दिसत असून शिक्षणाधिकारी याबाबत काय कारवाई करतात याकडे दोन्ही तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.