जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सांगळे यांची पुण्याला बदली
कोरोना काळात उल्लेखनीय काम : डाॅ. नागरगोजे नवे डीएचओ
अहमदनगर : जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संदीप सांगळे यांची पुण्याला आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात प्राचार्यपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी आता नगरला जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नाशिक मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. बापूसाहेब नागरगोजे हे बदलून आले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात डाॅ. सांगळे यांचाही समावेश आहे. सांगळे यांनी यापूर्वी बीड येथे जिल्हा आरोग्य अधिकारी, तसेच जागतिक आरोग्य संघटनेतही उत्कृष्ट काम केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून ते नगरला जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. यात त्यांनी कोरोना काळात उल्लेखनीय काम केले. प्रारंभी कोरोना रुग्णांच्या बेडची व्यवस्था, ॲाक्सिजन पुरवठ्यापासून रुग्णांच्या चाचण्या, तसेच औषधोपचार यात त्यांनी सर्व आरोग्य यंत्रणेला बरोबर घेऊन काम केले. त्यानंतर कोरोना लसीकरणाचेही उत्कृष्ट नियोजन करून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण घडवून आणले. पदोन्नतीसह आरोग्य कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. नवीन झालेल्या जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांना त्यांनी सामाजिक संस्थांच्या मदतीने आरोग्य साहित्य मिळवून दिले.
जिल्हास्तरावरून आता विभागीय स्तरावर त्यांना कामाची संधी मिळणार आहे.
दरम्यान, नव्याने बदलून येणारे डाॅ. नागरगोजे यांनी पूर्वी नगरलाच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे.