नगर : केंद्र सरकार मान्यताप्राप्त पर्यावरण विकास या संस्थेच्यावतीने देण्यात येणारा राष्ट्रीय पर्यावरण रक्षक 2023 पुरस्कार नगर तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी शितल पेरणे-खाडे यांना प्राप्त झाला आहे. ग्रामीण भागात वृक्ष लागवड, कुऱ्हाड बंदी, डीजे बंदी, प्लॉस्टिक बंदी, हागणदारीमुक्त गाव, स्वच्छता अभियान, जलवायू प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना, बेटी बचाव बेटी बढाओ या उपक्रमांत सक्रिय योगदान दिल्याबद्दल पेरणे यांचा हा सन्मान करण्यात आला आहे.
राळेगण सिध्दी येथे झालेल्या राष्ट्रीय पर्यावरण रक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण शितल पेरणे-खाडे यांना करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक पद्भूषण अण्णा हजारे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे 13 वे वंशज श्रीमंतराजे भूषणसिंह होळकर, ॲड.महेश देवकाते, रामनाथ मंडलिक, गोरक्ष बढे, पालवे मेजर, ॲड.संतोष गायकवाड, डॉ.योगेश पवार, पर्यावरण विकासचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरक्षनाथ गवते आदी उपस्थित होते.
शितल पेरणे-खाडे यांनी 20 वर्षांच्या सेवाकाळात नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा, अरणगांव, देऊळगाव सिध्दी याठिकाणी ग्राम विकास अधिकारी म्हणून सेवा केलेली आहे. सध्या त्या श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे व्हा.चेअरमनपदही त्यांनी भूषविले आहे. सध्या त्या जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या महिला अध्यक्षपद सांभाळत आहेत. ग्रामीण भागात शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती करतानाच त्या ग्रामसेवक संघटनेतही सक्रिय योगदान देऊन ग्रामसेवक संवर्गाचे प्रश्न सोडविण्यात अग्रेसर असतात. या पुरस्काराबद्दल शितल पेरणे-खाडे यांचे पद्मश्री पोपटराव पवार, ग्रामसेवक संघटनेचे मा.राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, गट विकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, संघटनेचे सरचिटणीस अशोक नरसाळे, महासंघाचे अध्यक्ष सुनिल नांगरे, पतसंस्थेचे व्हा.चेअरमन गोरक्षनाथ शेळके, मानद सचिव श्याम भोसले, युवराज पाटील, मंगेश पुंड, सामाजिक कार्यकर्ते संतोष खाडे, पतसंस्थेचे सचिव प्रदीप कल्याणकर, वरिष्ठ सहायक नफीसखान पठाण आदींसह सर्व ग्रामसेवकांनी अभिनंदन केले आहे.