Sunday, December 8, 2024

प्राथमिक शिक्षकांच्या बदलीत सवलत…ससून रूग्णालयात होणार प्रमाणपत्रांची पडताळणी

अहमदनगर-जिल्हा परिषद कर्मचार्‍यांपाठोपाठ आता बदलीत सवलत घेतलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रमाणपत्राचीही पडताळणी केली जाणार आहे. शिक्षणाधिकार्‍यांनी याबाबत आदेश काढले आहेत. पुण्यातील ससून रूग्णालयात या 536 शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी होणार आहे. यामुळे शिक्षकांच्या बदल्यांमध्ये संवर्ग एकमध्ये बदलीचा लाभ घेणार्‍या अपंग प्रमाणपत्रांची पोलखोल होण्याची शक्यता आहे.

प्राथमिक शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया नोव्हेंबर 2022 मध्ये झाली. यात जिल्ह्यात सुमारे 1 हजार 800 बदल्या झाल्या. त्यात 536 शिक्षकांनी दिव्यांगत्वाचे व दुर्धर आजाराबाबत प्रमाणपत्र सादर करुन बदलीत संवर्ग-1 चा लाभ घेतला आहे. तसेच पाल्य, जोडीदार दिव्यांग असल्यामुळेही काही शिक्षकांनी संवर्ग-1 मधील लाभ घेतला आहे. परंतु यातील अनेक शिक्षकांचे दिव्यांग प्रमाणपत्र किंवा त्यांनी जोडलेले दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार सावली दिव्यांग संघटनेसह काही इतर संघटनांनी केली होती.
मूळात जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या मे 2023 मध्ये झालेल्या बदल्यांतही अशीच मागणी पुढे आली होती. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी कर्मचार्‍यांना तंबी देत बदल्यांच्या आधीच अशी बनावट प्रमाणपत्र असतील तर बदलीतून सूट नाकारा, अन्यथा निलंबनासह बडतर्फीची कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. शिवाय ज्यांनी बदलीसाठी सवलत घेतली त्यांची प्रमाणपत्र पडताळणी करण्याचाही निर्णय घेतला. त्याचवेळी शिक्षकांच्या प्रमाणपत्राचीही चौकशी करण्याची मागणी झाली होती. परंतु त्यावेळी निर्णय न घेता आता दोन महिन्यांनी शिक्षणाधिकारी भास्कर जाधव यांनी सर्व गटविकास अधिकार्‍यांना सूचना देत बदलीत सवलत घेतलेल्या शिक्षकांनी त्यांची प्रमाणपत्र पुण्यातील ससून रूग्णालयातून पडताळणी करून आणण्याचे आदेश काढले आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles