बनावट दिव्यांगांचे ‘व्हिडीओ’ सीईओंना सादर करणार
ससूनच्या अहवालाची प्रतीक्षा : ससूनची प्रमाणपत्रेही बनली संशयास्पद
अहमदनगर : नोकरी मिळविण्यासाठी, बदलीसाठी व बढतीसाठी अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी दिव्यांग असल्याचा बहाणा करून खोटी प्रमाणपत्रे काढली आहेत. सरकारी डॉक्टरांनी ज्या कर्मचाऱ्यांना दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे, अशा कर्मचाऱ्यांचे ते धडधाकट असल्याचे ‘व्हिडीओ’ आपण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करणार आहोत, असे सामाजिक कार्यकर्ते विजय शिरसाठ यांनी सांगितले.
शिरसाठ यांनी दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन दिलेले आहे. शिरसाठ यांचे म्हणणे आहे की, जिल्हा रुग्णालयाने ज्या कर्मचाऱ्यांना दिव्यांग प्रमाणपत्रे दिली आहेत, ती ससूनकडून पडताळणी करून आणावीत, असे आदेश येरेकर यांनी दिले आहेत. मात्र, ससून रुग्णालयातही मोठे घोटाळे सुरू आहेत. तेथे अनेक डॉक्टर चुकीचे कामकाज करत असल्याचे समोर आले आहे. डाॅक्टरांचे सही-शिक्केदेखील गायब असल्याचेही उघडकीस आले आहे. त्यामुळे ससूनमधील तपासणीबाबतही शंका आहे.
काही कर्मचाऱ्यांना ससून रुग्णालयाने दिव्यांग असल्याची प्रमाणपत्रे दिली आहेत. ही प्रमाणपत्रेही संशयास्पद वाटतात. अनेक कर्मचाऱ्यांचे व्हिडीओ जिल्हा परिषदेतील इतर कर्मचाऱ्यांकडेच आहेत. हे कर्मचारी ठणठणीतपणे चालतात. त्यांच्यात कोणताही दृष्टिदोष दिसत नाही. अनेक कर्मचारी स्पष्टपणे ऐकतात. त्यांच्यात कोणताही कर्णबधिरपणा दिसत नाही. मग हे कर्मचारी सरकारी डॉक्टरांना दिव्यांग कसे दिसतात, हा प्रश्न आहे. त्यामुळे गरज पडल्यास हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी आपण हे सर्व व्हिडीओ न्यायालयात सादर करणार आहोत. सरकारी रुग्णालयेच चुकीची प्रमाणपत्रे देत असतील व जिल्हा परिषद प्रशासन अशा कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असेल तर ही गंभीर बाब आहे. सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांची लष्करी रुग्णालयामार्फत तपासणी व्हावी. कारण, इतर सरकारी यंत्रणांबाबत संशय आहे, असे शिरसाठ यांचे म्हणणे आहे.
सदरील वृत्त दैनिक लोकमतने दिले आहे