Monday, September 16, 2024

नगरमधील कलाकेंद्र कलेच्या नावाखाली बनलेत डान्सबार! सुरेखा पुणेकरांच्या नेतृत्वात आंदोलनाचा इशारा

नगर (प्रतिनिधी)- डीजेमुळे कलाकेंद्रातील कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असताना, कलाकेंद्रातील डीजे साऊंड सिस्टीमवर बंदी घालण्याची मागणी अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. तर कलाकेंद्र सांस्कृतिक कलेच्या नावाखाली सर्रास डान्सबार बनले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यावेळी आरपीआयचे (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर, कबड्डी असोसिएशनचे जामखेड तालुकाध्यक्ष लक्ष्मण ढेपे, संघटनेचे अध्यक्ष धोंडीराम जावळे, उपाध्यक्ष युवराज गायकवाड, सचिव भीमराव काळोखे, कार्याध्यक्ष शिवाजी जावळेकर, महिला उपाध्यक्षा शोभा लाखे, महिला सचिव अर्चना जावळेकर, महिला कार्याध्यक्षा सविता अंधारे, विठ्ठल जावळेकर, विकास जावळेकर, महादेव कुडाळकर, कृष्णा मोहळकर, राजू कुडाळकर (आर.के.), प्रकाश काळे, ज्ञानेश्‍वर मोहरकर, रणजीत पाटणकर, विनोद काळे आदींसह जिल्ह्यातील व जामखेड तालुक्यातील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड या ठिकाणी सुमारे 9 कलाकेंद्र असून, सदरचे कलाकेंद्र सांस्कृतिक कलेच्या नावाखाली सरासर डान्सबार बनले आहेत. कलाकेंद्रात लावण्यात आलेल्या डीजे सिस्टीमने कलाकारांच्या हाताला काम राहिले नाही. परिणांई त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. पेटी, ढोलकी, तबला वादक, गायक आदी कलाकार आपल्या कामाला मुकले आहे. कलाकेंद्रात महाराष्ट्राची संस्कृती जपणारी मराठमोळी लावणी व लोकनाट्य असायचे, मात्र लोकनाट्य, संस्कृती कला केंद्राच्या नावाखाली सरासर डान्सबार सुरू झाले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
यापूर्वी दोन वेळा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले असून, निवेदनाची कसल्याही प्रकारे दखल घेण्यात आलेली नाही. हा प्रकार न थांबल्यास सर्व कलाकारांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने दिला आहे.
–—
शेंडी जवळील एका हॉटेलमध्ये अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेचा मेळावा पार पडला. लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या मेळाव्यात कलाकेंद्रात डीजे बंदीचा ठराव घेण्यात आला. तर यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करुन वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles