अहमदनगर -कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे दारू पिऊन झालेल्या बाप-लेकाच्या भांडणात पित्याने मुलाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक टाकून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे डिकसळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत विमल रोहिदास लाढाणे रा. डिकसळ, ता. कर्जत यांनी मिरजगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी रोहिदास बापूराव लाढाणे रा. डिकसळ, ता. कर्जत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्यासह मिरजगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पो.हे. सुनिल माळशिकारे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी रोहिदास बापूराव लाढाणे याला मिरजगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या घडलेल्या घटनेबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी यांचा मुलगा अमोल व पती रोहिदास हे दोघे दारू पिऊन येऊन घरच्या पडवीत बसलेले असताना त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली.
त्यावेळी त्यांना गप्प बसा, भांडण करू नका, असे फिर्यादी व फिर्यादीची सून त्यांना समजून सांगत असताना फिर्यादीचा मुलगा अमोल याने आरोपी रोहिदास याला शिवीगाळ केली, यामुळे दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली.
घरच्या पडवीच्या बाहेर हाणामारीत फिर्यादीचा मुलगा वट्यावरून खाली पडला, ते पाहून आरोपी यास मयत अमोल याने शिवीगाळ केल्याच्या कारणावरून रागाच्या भरात तेथेच पडलेल्या सिमेंट ब्लॉक उचलून आरोपी रोहिदास याने फिर्यादीचा मुलगा अमोल याच्या डोक्यात टाकला व पुन्हा सिमेंटचा दुसरा ब्लॉक उचलून तोंडावर टाकून त्याचा खून केला.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे करत आहेत. आज रात्री मिरजगाव येथील जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदहे शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला आहे






