कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसी पाटेगाव-खंडाळा येथे व्हावी यासाठी आमदार रोहित पवार आग्रही होते मात्र सरकारने एमआयडीसीची जागा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप आमदार राम शिंदे हे नागरिकांना जागा सुचवण्यासाठी बैठका घेत आहेत. यावरून रोहित पवार यांनी भाजप आमदार राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
रोहित पवार म्हणाले, माझे विरोधक हे कुठल्यातरी एखाद्या जमिनीवर जातात, अधिकाऱ्यांना बोलावतात आणि फोटो काढतात. मात्र त्यांना हेच माहीत नाही की सर्व्हे कसा केला जातो? आमदार राम शिंदे यांच्या सोबत जे अधिकारी इकडे- तिकडे फिरत आहेत. त्यांना एमआयडीसीकडून अधिकृत कोणतही पत्र मिळालं नाही. केवळ फोटो काढून लोकांना असं भासवायचं की, मी खूप काम करत आहे. मात्र लोकं एवढी भोळी नाहीत, लोकांना सर्व कळतं. एवढे मोठे सर्व्हे आम्ही करून घेतले. त्यावेळी मी स्वतः कुठेही गेलेला नव्हतो. अधिकाऱ्यांनी सर्व ड्रोन सर्व्हे केले. एमआयडीसीसाठी योग्य ते ठिकाण अधिकाऱ्यांनीच निवडला आहे. आमचे विरोधक नाटक किती दिवस करतात हे बघावे लागेल असा टोला त्यांनी लगावला.
एमआयडीसी बाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना पत्र मिळाले असून ते सोशल मीडियावर पत्र देखील व्हायरल झाले आहे. सर्व्हेबाबत मी नागरिकांना जागा सुचवायला सांगितले आहे. मी कुठेही फोटो काढायला गेलेलो नाही. मी तरी नागरिकांच्या मीटिंग घेतोय. पण माझा रोहित पवारांना ओपन सवाल आहे की, त्यांनी जागा निवडताना एखादी तरी बैठक घेतली होती का? त्यांनी निवडलेली जागा नेमकी कोणाची होती? निरव मोदीच्या जागेसाठी काही बोलणं झालं होतं का ? पाटेगाव ग्रामपंचायत न विरोध का केला? फॉरेस्टमधील जागा का सुचवली? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत असं राम शिंदे यांनी म्हंटलं आहे.