कर्जत:कर्जत तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध करण्यात आमदार प्रा. राम शिंदेंना यश आले आहे. या निवडणुकीसाठी विविध मतदारसंघातून तब्बल 36 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 13 संचालक सर्वानुमते बिनविरोध करण्यात आल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी दिली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले, ‘अलीकडच्या काळात काही लोकप्रतिनिधी खासगी मालकीच्या संस्था नामनिर्देशित करून मतदारसंघातील सहकारी संस्था मोडीत काढण्याचे प्रयत्न करीत आहे. परंतु त्यांचा हा कुटील डाव आणि कारस्थान कदापि यशस्वी होऊ देणार नाही,’ असे नाव न घेता शिंदेंनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. ‘कर्जत तालुका खरेदी-विक्री संघ पुन्हा उर्जित अवस्थेत आणून या संस्थेचे वैभव पुन्हा प्राप्त करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करणार आहे,’ असा शब्दही शिंदेंनी यावेळी दिला.