अहमदनगर -पतीने पत्नीसह मुलीवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना केडगाव उपनगरात अरणगाव रस्त्यावर विद्यानगर येथे घडली. हल्ल्यात पुष्पा बबन बोठे (वय 55) व मुलगी प्रिती जखमी झाल्या असून त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी पुष्पा यांनी कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पती बबन कुंभराज बोठे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पुष्पा यांचे पती बबन हे गेल्या दोन वर्षापासून त्यांच्यासोबत राहत नाही. 22 सप्टेंबर रोजी दुपारी फिर्यादी, त्यांची मुलगी, नातू, जावई घरी असताना बबन तेथे आला. त्याने फिर्यादीकडे सोन्याची मागणी केली. आज सोने दिले नाही तर तुला जिवे ठार मारून टाकीन, अशी धमकी देत धक्काबुक्की केली. त्याच वेळी त्याने खिशातून धारदार हत्यार बाहेर काढले व पत्नी पुष्पावर हल्ला केला. या हल्ल्यात पुष्पा गंभीर जखमी झाल्या. भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेली मुलगी प्रितीवर देखील हल्ला करण्यात आला असून त्या जखमी झाल्या आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.