स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी रामायणातील प्रसंग केले जिवंत
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव शालेय विद्यार्थ्यांची बदलत जाणारी मनस्थिती, पालकांचे त्यांच्यावर असलेले अपेक्षांचे ओझं आणि या सगळ्यातून मार्ग दाखवत विद्यार्थी घडवणारे शिक्षक समाज घडविण्याचे कार्य करत आहे. आपण प्रत्येक ठिकाणी शिक्षण घेत असतो. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे काम करतात. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहून ते साकार करण्यासाठी परिश्रम घ्यावे. मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्याची भावना उद्योजक राजेंद्र शिंदे यांनी व्यक्त केली.
केडगावच्या महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी शिंदे बोलत होते. संस्थेचे सचिव बबनराव कोतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रमेश गवळी, उपाध्यक्ष जाफर शेख, खजिनदार प्रल्हाद साठे, रावसाहेब सातपुते, दगडूजी साळवे, भास्करराव जासूद, डॉ. सुभाष बागले, जयश्री कोतकर, मनीषा थोरात, छाया सुंबे, संजयकुमार निक्रड, राजेश सोनवणे, मुख्याध्यापिका वासंती धुमाळ, सखाराम गारुडकर, रेणुका म्हस्के आदींसह सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका वासंती धुमाळ यांनी अहवाल वाचन करुन विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख सर्वां समोर मांडला. शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींना राजेंद्र शिंदे व सुमन कुरेल यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कौतुकाबरोबर शिक्षकांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षकेतर कर्मचारी यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नाट्य व नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण विद्यार्थिनींनी केले. 22 तारखेला होणाऱ्या अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने रामायणातील प्रसंग सादर करण्यात आले. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे क्षण कार्यक्रमातून जिवंत केले. विद्यार्थ्यांनी श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान, शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आशा वेगवेगळ्या रुपात सादरीकरण केले. या सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षक व पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. मोबाईल मुळे होणारे दुष्परिणाम दाखवणारा मूक अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधले. सांस्कृतिक कार्यक्रमात बालवाडी ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती गुंड व राजेश्री वायभासे यांनी केले.
केडगावच्या महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात अवतरले भगवान श्रीराम, सिता, लक्ष्मण, हनुमान
- Advertisement -