अहमदनगर -जागेच्या वादातून व्यावसायिकावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. अमोल रतनसिंग ठाकूर (वय 48 रा. चिपाडे मळा, केडगाव) असे जखमी केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल गौतम ठाकूर, कुणाल गौतम ठाकूर, गौतम रमेश ठाकूर (तिघे रा. जुना बाजार, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शनिवारी (24 ऑगस्ट) दुपारी साडेबाराच्या सुमारास नांगरे गल्लीत ही घटना घडली. सायंकाळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीची नांगरे गल्लीत चहाची टपरी आहे. त्यांचे संशयित आरोपींसोबत जागेवरून वाद आहेत. या कारणातून शनिवारी दुपारी संशयित आरोपी यांनी फिर्यादीच्या चहाच्या टपरीवर येत नुकसान केले. फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कुणाल ठाकूर याने धारदार शस्त्राने फिर्यादीच्या डोक्यात वार करून त्यांना जखमी केले. जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी फिर्यादी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार सचिन गायकवाड करत आहेत.