कोपरगाव -तालुक्यातील एका आश्रमातील महाराजांवर तिघांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी घडली. ही बाब महाराजांच्या चाहत्यांच्या लक्षात येताच त्यांनी हल्ला करू पाहणार्या तिघांना ताब्यात घेतले. हल्ल्याचा प्रयत्न का झाला याची माहिती समजू शकली नाही. तालुक्यातील एक महाराज कार्यक्रमाच्या निमित्ताने एका गावात आले होते. त्याचवेळी तिघांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण ही बाब महाराजांचे चाहते व ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांना त्यांनी ताब्यात घेतले.
या घटनेनंतर महाराजांचे समर्थक संतापले. त्यांनी या हल्ले करणार्या व्यक्तींविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गाठले. या घटनेची माहिती कळताच मोठी गर्दी झाली होती. हे हल्लेखोर राहुरी तालुक्यातील असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराजांच्या समर्थकांकडून होत होती. पण दोन्ही बाजूने समेट घडवून या प्रकरणावर पडदा टाकण्याचे काहींचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत याबाबत चर्चा सुरू होती. रात्री 11 वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.