नगर : लोकसभा निवडणूक प्रचारसभेत प्रक्षोभक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पोलीस अंमलदार अतुल काजळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी राऊत नगरमध्ये आले होते व त्यांची ८ मे रोजी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या समवेत स्टेशन रस्त्यावरील क्लेरा ब्रूस विद्यालयाच्या मैदानावर प्रचार सभा झाली होती. या सभेत त्यांनी प्रक्षोभक व्यक्तव्य केल्याचा आरोप आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रात झाला म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. औरंगजेब याचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे. ती जी माती आहे ती औरंगाजेबाची माती आहे. त्या मातीतले हे दोन व्यापारी आहेत. औरंगजेबचा जन्म नरेंद्र मोदींच्या गावात झाला आहे, इतिहास पहा तुम्ही. दावत नावाच गाव आहे, अहमदाबादच्या बाजूला, औरंगजेब तेथे जन्माला आला आहे. त्यामुळे आपल्याशी ते औरंगजेबी वृत्तीने वागत आहेत. २७ वर्षे तो औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढत होता आणि शेवटी त्या औरंगजेबाला आम्ही या महाराष्ट्रात गाडून त्याची कबर खणलेली आहे. तेव्हा ‘नरेंद्र मोदी तू कौन है’, असे वक्तव्य राऊत यांनी प्रचारसभेत केले होते.
देशाच्या पंतप्रधानांचा एकेरी भाषेत उल्लेख करून प्रक्षोभक भाषण केले. पंतप्रधान यांना गाडण्याची धमकी दिली. तसेच दोन धर्मामध्ये द्वेषाची व वैरत्वाची भावना निर्माण करण्याचा भाषणादरम्यान प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.