नगर : लोणी बु. चे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यात्रेच्या निमित्ताने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील परिवाराने म्हसोबा देवाला महाअभिषेक केला. दुपारी डॉ. सुजय विखे पा., धनश्री विखे पाटील यांनी मुलं अनिशा आणि श्री यांच्यासमवेत म्हसोबा काठीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी विखे दाम्पत्याने मुलांसोबत संपूर्ण यात्रा फिरून यात्रेतील सर्व गोष्टींचा मनमुरादपणे आनंद लुटला. वेगवेगळ्या पाळण्यांवर बसून धमाल करणे असो किंवा विविध खेळणी खरेदी करणे असो. अशा सर्व गोष्टींचा यावेळी आनंद घेतला. तसेच यात्रेतील विविध चटकदार आणि जिभेचे चोचले पुरविणाऱ्या विविध पदार्थांचा आस्वाद देखील घेतला.
या यात्रेनिमित्त जनसेवा फाउंडेशनच्या मार्फत स्वयंसिद्धा यात्रेचे प्रदर्शन देखील भरवण्यात येते. यामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन-विक्री, खाद्य महोत्सव, पशु-पक्षी प्रदर्शन आयोजित केले जाते. स्वयंसिद्धा यात्रा म्हणजे ही महिला बचत गटांसह संपूर्ण जिल्ह्यासाठी एक पर्वणीच असते. या अनुषंगाने लावण्यात आलेल्या विविध स्टॉल्स ना भेटी देऊन अनेक खेळणी व इतर गोष्टी मुलांसोबत खरेदी केल्या व खाद्य महोत्सवातील दाबेली, पाणीपुरी, धिरडे, शिपी आमटी अशा वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखली. अशा प्रकारे एक अत्यंत अविस्मरणीय अशी यात्रेची मज्जा मुलांसोबत लुटता आली या गोष्टीचा विशेष आनंद आहे, अशा भावना धनश्री विखे पाटील यांनी सोशल मिडिया पोस्ट व्यक्त केल्या आहेत.