स्व.मनोहर जोशी स्मृतीप्रित्यर्थ गुरुवारी सर्वपक्षिय श्रद्धांजली सभा
नगर – माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. मुख्यमंत्री असतांना नगर शहरास दोनवेळेस भेट दिली होती. त्यांचे शिवसेना उपनेते स्व.अनिल राठोड यांच्यावर विशेष प्रेम होते. त्यांच्या मंत्रीमंडळात स्व.राठोड मंत्री होते. स्व.मनोहर जोशी यांच्यासमवेत नगरमधील अनेकांचे चांगले संबंध होते. त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वपक्षिय श्रद्धांजी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
नगर शहरामध्ये स्व.मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे गुरुवार दि. 29 फेब्रुवारी 2024 रोजी सायं. 5 वा. चितळे रोड येथील जिल्हा वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात आयोजन केले आहे. तरी या श्रद्धांजली सभेसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले आहे.
यासाठी जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे, महापौर रोहिणी शेंडगे, शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, बाळासाहेब बोराटे आदिंनी नियोजन केले आहे.