मर्चंटस बॅंकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता समारंभास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार
मर्चंटस बॅंकेच्या संचालक मंडळ सदस्यांनी नागपूर येथे जाऊन दिले आग्रहाचे निमंत्रण
नगर: अहमदनगर मर्चंटस को ऑप बॅंकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय दळणवळत मंत्री नितीन गडकरी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मर्चंटस बॅंकेचे व्हा. चेअरमन अमित मुथा, संचालक सी.ए., आयपी अजय मुथा, किशोर गांधी, किशोर मुनोत यांनी नागपूर येथे मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. त्याला गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बॅंकेच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीची उत्सुकतेने माहिती घेतली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सी.ए., आयपी अजय मुथा यांनी बॅंकेच्या वाटचालीची माहिती दिली. बॅंकेचे संस्थापक संचालक हस्तीमलजी मुनोत यांनी ५० वर्षांपूर्वी व्यापार, उद्योगाला हक्काची आर्थिक पत मिळवण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसह मर्चंटस बॅंकेची मुहूर्तमेढ रोवली. बॅंकेमुळे अहमदनगर शहर तसेच जिल्ह्यातील अर्थकारणाला चालना मिळाली. तसेच या वाटचालीत बॅंकेने सातत्याने आधुनिक बॅंकिंग सेवा देण्यावर भर दिला आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल बॅंकिंग धोरणानुसार युपीआयसह सर्व प्रकारच्या ऑनलाइन बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. हस्तीमलजी मुनोत यांचा सहकारी बँकिंग क्षेत्रात सलग ५५ वर्षे योगदान देताना नेहमीच आधुनिक बॅंकिंगला प्रोत्साहन देत दूरदृष्टीने बॅंकेला सातत्याने प्रगतीपथावर नेले आहे.
बॅंकेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्सुकतेने माहिती घेत कौतुक केले. तसेच बॅंकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता समारंभास उपस्थित राहण्याची तयारी दर्शविली आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची वेळ मिळवून देण्यासाठी विशेष सहकार्य केले आहे. आता केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिलेल्या वेळेनुसार समारंभाची तारीख निश्चित केली जणार आहे अशी माहिती व्हा. चेअरमन अमित मुथा यांनी दिली.