थोरात यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ स्वप्न भंगणार :प्रा. शिंदे यांचा दावा
नगर – * संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांना विचारल्याशिवाय काही करण्याची हिम्मत कोणात नाही. अशा स्थितीत तेथे त्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे फलक लागले. त्यामुळे त्यांच्या मनातली गोष्ट लपून राहीलेली नाही, परंतु त्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ स्वप्न भंगणार आहे, असा दावा माजी पालकमंत्री व आमदार प्रा. राम शिंदे यांनी शनिवारी सायंकाळी प्रेमदान हडको येथे केला. तुम्ही ओरबाडून सत्ता मिळवली होती, परंतु आता माणसे सांभाळताना तुमची धांदल उडाली आहे. देशात विरोधी पक्ष नेता देता येईल, एव्हडीही संख्या तुमच्या पक्षाला गाठता आलेली नाही, अशी टीकाही प्राध्यापक शिंदे यांनी थोरात यांच्यावर केली.
भाजपचे सध्या घर चलो अभियान सुरू असून त्या अंतर्गत शनिवारी सायंकाळी सावेडी येथील प्रेमदान हडको परिसरात प्राध्यापक शिंदे यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या व मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, सरचिटणीस सचिन पारखी, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, महिला जिल्ह्याध्यक्ष प्रिया जानवे आदीसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अबकी बार 400 पार, जय श्रीराम, भारत माता की जय घोषणा देण्यात आल्या.
यावेळी माध्यमांशी बोलताना माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रभावी काम केले आहे व आताही उपमुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून ते कर्तव्यदक्ष काम करीत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे फडणवीस यांच्यावर टीका करताना पातळी सोडत आहेत. ते स्वतः मनोरुग्ण झाले आहेत व त्यांच्या सत्तेच्या काळात ते घरकोंबडा होते. करोना काळात कोणाच्या दुःखातही सहभागी होत नव्हते. त्यांची निष्क्रियता त्याच वेळी दिसली होती, पण आता निवडणूक असल्याने ते फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत, असा दावा करून शिंदे म्हणाले, विरोधकांनी केलेली राष्ट्रपतीची राजवट मागणी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. राज्यातली कायदा व सुव्यवस्था स्थिती चांगली आहे. आपसातील वादातून काही घटना घडल्या असल्या तरी लोकांचे जीव जात असताना त्यावर राजकारण करणे व टोकाच्या टीका करणे, महाराष्ट्राची तुलना बिहारशी करणे हे विरोधकांना शोभत नाही, असा दावाही शिंदे यांनी केला.
उद्धव ठाकरे जखमी वाघ असल्याचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणत असले तरी त्या जखमी वाघाला आता दात राहिले नाही व तो व्याकूळ झाला आहे. काहीही करू शकत नाही. उलट पाटलांची अवस्था अशी झाली की त्यांनी त्यांच्या पक्षाचा कर्जत तालुक्यात अध्यक्षच नेमला नाही. मात्र, उपाध्यक्ष, सरचिटणीस अशी पदे नेमून इतिहासात प्रथमच अध्यक्ष नसलेली कार्यकारीणी करून त्यांच्या पक्षाची स्थिती दाखवून दिली आहे. कर्जतच्या त्यांच्या मेळाव्यास माणसेच आली नसल्याने घरात तो घ्यावा लागला व फक्त नेते आणि त्यांच्यासमोर माईक असलेले फोटोच काढावे लागले, असा दावाही शिंदे यांनी केला.
*उमेदवार कोण आज सांगता येणार नाही :प्रा. राम शिंदे
लोकसभेच्या नगर दक्षिण मतदार संघातील भाजपचा उमेदवार कोण हे आज सांगता येणार नाही. राज्याचे पार्लमेंटरी बोर्ड त्यावर चर्चा करून केंद्राच्या पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवणार आहे. तेथून उमेदवारी जाहीर होणार आहे. मी नगर दक्षिणेतून लढण्यास इच्छुक असल्याचे मागेच सांगितले आहे व त्या यादीत माझे नाव आहे, असेही प्राध्यापक शिंदे म्हणाले. देशात आता रामराज्य आले आहे व नगर जिल्हा देशातच असल्याने येथेही रामराज्य आले आहे, असे सूचक भाष्यही प्रा.राम शिंदे यांनी केले.