पारनेर शहरात आठ ते नऊ जणांनी राहुल झावरे यांना मारहाण केली आहे. तसेच त्यांची गाडी फोडून टाकली आहे. या मारहाणीत राहुल झावरे जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, सध्या पारनेर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर हा राडा झाला आहे. अद्याप हा हल्ला नेमका कोणी केला याबाबतची माहिती मिळाली नाही. लंके समर्थक राहुल झावरे यांना झालेल्या मारहाणीनंतर पारनेर पोलीस ठाण्यात मोठा जमाव आला आहे. मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करत कठोर करावाईची मागणी केलीय. लंके समर्थक आक्रमक झालेत. त्यामुळं पारनेर पोलीस ठाण्यासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
दरम्यान, सुजय विखे पाटील यांचे समर्थक विजय औटी यांच्याकडून राहुल झावरे यांना मारहाण झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केलाय. विखे पाटलांमध्ये पराजय पचवण्याची ताकद नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचे फाळके म्हणाले. याबाबत गृहमंत्र्यांनी निःपक्षपातीपणे चौकशी करून करावाई करण्याची मागणीही त्यांनी केलीय. तसेच दोषींवर कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा फाळकेंनी दिलाय.