अहमदनगर-मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत महापालिकेत 26 प्रशिक्षणार्थींची नियुक्ती करण्यास महापालिकेने पुढाकार घेतला आहे. सोमवारी या सर्वांना प्रशिक्षणासाठी नियुक्ती पत्र आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे व आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे यांच्या हस्ते देण्यात आली. दरम्यान, या योजनेत 127 अर्ज आले असून, यापैकी 72 जणांनी प्रशिक्षण घेण्याची तयारी दाखवली आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अहमदनगर महापालिकेत डॉक्टर, अभियंते, परिचारिका, प्रयोगशाळा तज्ञ यांसह विविध 140 पदे भरण्यात येत आहे. यासाठी 127 अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील 72 जणांनी प्रशिक्षण घेण्याची तयारी दर्शविली आहे. तर पहिल्या टप्प्यात 26 जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. यात 12 वी पास साठी 6 हजार, आय. टी. आय पदविकासाठी 8 हजार, पदवीधर व पदव्युत्तरांसाठी 10 हजार याप्रमाणे विद्या वेतन दिले जाणार आहे.
या योजनेअंतर्गत महापालिकेच्या आस्थापनेवरील मंजूर असलेल्या 2 हजार 870 पदांच्या 5 टक्के जागांवर म्हणजे 140 पदांची भरती करण्यात येणार आहे. उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून उमेदवारांची निवड गुणपत्रकाच्या गुणानुक्रमानुसार (मेरीट नुसार) करण्यात येत आहे. या अंतर्गत क्लर्क कम टायपिस्ट – 30, स्टेनो-4, अकाउंट क्लर्क-3, सहाय्यक ग्रंथपाल-1, संगणक प्रोग्रामर-3, कनिष्ठ अभियंता (सिव्हील)-5, कनिष्ठ अभियंता (मॅकेनिकल) -3, विद्युत पर्यवेक्षक-3, कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल)- 1, मोटार मॅकेनिक -3, असिस्टंट गार्डनर -2, सहाय्यक क्रीडा अधिकारी -2, सॅनिटरी सब इन्स्पेक्टर-8, वैद्यकीय अधिकारी-10, लॅब टेक्निशियन -3, कंपाउंडर -2, परिचारिका जीएनएम -10, परिचारिका एएनएम-10, फायरमन -10, वॉटर लॅब टेक्निशियन -4, पंप चालक-5, फीटर/प्लंबर 5, इलेक्ट्रिशियन- 5, वायरमन-5, सांख्यिकी सहाय्यक-3 अशा 140 पदांवर काम करण्याची संधी देण्यात येणार आहे.
सोमवारी लिपीक-14, लॅब टेक्निशियन -3, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 2, स्टेनो-2, फार्मासिस्ट -1, ग्रंथपाल -1, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) -1, संगणक प्रोग्रामर -1, मोटार मेकॅनिक -1, अशा 26 जणांना नियुक्ती पत्र देण्यात आल्याचे आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे यांनी सांगितले. युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव व प्रशिक्षण मिळेल त्याचा फायदा त्यांना भविष्यात होईल. शिवाय या माध्यमातून विद्या वेतन मिळणार असल्याने नगर शहरातील युवकांना रोजगारही उपलब्ध होईल. त्यामुळे या योजनेचा पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.