भर हिवाळ्यात अहमदनगर शहरातील नागरिकांना पाणी प्रश्नाचा सामना करावा लागण्याची शक्यता असून, त्याचं कारण म्हणजे अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा कोणत्या क्षणी खंडित होऊ शकतो. याबाबत मुळा धरण प्रशासनाने अहमदनगर महानगरपालिकेला एक पत्र पाठवून याबाबत माहिती देखील दिली आहे. अहमदनगर महानगरपालिकेकडे तब्बल 6 कोटी 97 लाख 50 हजार 219 रुपयांची पाणीपट्टी थकीत असून, ती त्वरित भरण्यात यावी अन्यथा पाणीपुरवठा कोणत्या क्षणी खंडित होईल असा इशारा मुळा पाटबंधारे विभागाने दिला आहे.
अहमदनगर महानगरपालिकेकडे ऑक्टोबर महिन्यापर्यंत 6 कोटी 97 लाख 50 हजार 219 रुपयांची बिगर सिंचन पाणीपट्टी थकीत आहे. दरम्यान, महानगरपालिकेने 28 डिसेंबर रोजी 18 लाख 97 एवढ्याच रकमेचा भरणा केला. सोबतच सर्व जल मापकांचे नोंदणीकृत संस्थेकडून मोजमाप तंत्र प्रमाणपत्र पाठबंधारे कार्यालयात सादर केलेले नाहीत. त्यामुळे पाणीपट्टी थकबाकीचा त्वरित भरणा करावा आणि मोजमाप तंत्र प्रमाणपत्र पाठबंधारे कार्यालयात सादर करावे यासाठी महानगरपालिकेला पत्र पाठवण्यात आले आहे. तसेच असे न झाल्यास करारनाम्यातील अटी व शर्ती मधील अट क्र. 9 नुसार पाणी पुरवठा कुठल्याही क्षणी खंडित करण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.