महापालिकेच्या स्थायी समिती व महासभेत विना मालमत्ता कर व पाणीपट्टी वाढीचे 2024-25 चे वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यात आले. स्थायी समितीसमोर 1400 कोटी 91 लाखांचे अंदाज पत्रक सादर करण्यात आले. महासभेत सुधारणा करून सुमारे 1560 कोटी 91 लाखांचे वाढीव बजेट आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी सादर केले. किरकोळ कर वगळता मनपाने विना कर वाढीच्या बजेटचे गिफ्ट नगकरांना दिले.
महापालिकेची स्थायी समितीची सभा बुधवारी आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त डॉ. श्रीनिवास कुर्हे, उपायुक्त डॉ. सचिन बांगर, प्रभारी उपायुक्त सपना वसावा, मुख्यलेखाधिकारी डॉ. सचिन धस, मुख्यलेखा परीक्षक विशाल पवार, नगर सचिव मेहेर लहारे, अनिल लोंढे आदी उपस्थित होते. महापालिकेत पदाधिकार्यांची मुदत संपल्यानंतर प्रशासकराज सुरू झाले. प्रशासकाच्या काळात प्रशासकीय स्थायी समिती व महासभा वेळोवेळी होत आहे. बुधवारी मुख्यलेखाधिकारी डॉ. सचिन धस यांनी स्थायी समितीच्या सभेत 1400 कोटी 91 लाखांचे 2024 चे वार्षिक अंदाजपत्रक समितीचे अध्यक्ष तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांच्याकडे सादर केले. त्यावर किरकोळ चर्चा होऊन अंदाज पत्रक मंजूर करण्यात आले.
दरम्यान, काही वेळाचा अवधी घेत लगेच महासभा घेण्यात आली. महासभेत लेखाविभागाचे अनिल लोंढे यांनी स्थायी समितीने मंजूर केलेले बजेट आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांच्यासमोर मांडले. त्यात काही हेडच्या बजेटमध्ये वाढ करण्यात आली. त्यात रस्ते खोदाई, मालमत्ता कर, कर्ज प्रकरणामध्ये वाढ करण्यात आली. मालमत्ता करामध्ये 20 कोटी व रस्ते खोदाईमध्ये सुमारे 20 कोटींची वाढ करण्यात आली. तर, विविध विकासकामांसाठी महापालिका राष्ट्रीयकृत बँकाकडून 50 कोटींचे कर्ज घेत असते. यावर्षी त्यात शंभर कोटींची वाढ करण्यात आली असून, आता 150 कोटींचे कर्ज घेण्यात येणार आहे. महासभेत चर्चेअंती सुधारणा केल्यानंतर 1560 कोटी 91 लाखांचे अंतिम बजेटला मंजुरी देण्यात आली.
महानगरपालिका अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न 430 कोटी 82 लाख, भांडवली जमा 446 कोटी 95 लाख अंदाजित आहे. महसुली उत्पन्नात संकलित करापोटी 83 कोटी 80 लाख, संकलित करावर आधारीत करापोटी कोटी लाख, जीएसटी अनुदान 130 कोटी, गाळा भाडे 3 कोटी 71 लाख, 25 लाख व इतर महसुली अनुदान 15 कोटी 63 लाख, पाणीपट्टी 30 कोटी लाख, मिटरद्वारे पाणी पुरवठापोटी 10 कोटी, संकीर्णे 30 कोटी 66 लाख आदीचा समावेश आहे.
खर्च बाजूस वेतन, भत्ते व मानधनावर 169 कोटी 96 लाख, पेन्शन 49 कोटी, पाणी पुरवठा विज बिल 36 कोटी, स्ट्रीट लाईट वीज बिल 6 कोटी, शिक्षण विभाग वेतन हिस्सा व इतर खर्च हिस्सा 7 कोटी 25 लाख, महिला व बाल कल्याण योजना 3 कोटी 05 लाख, अपंग पुनर्वसन योजना 3 कोटी 05 लाख, मागासवर्गीय कल्याणकारी योजना 10 कोटी, औषधे व उपकरणे 1 कोटी 20 लाख, कचरा संकलन व वाहतूक 2 कोटी 50 लाख, पाणी पुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती 1 कोटी, टँकरद्वारे पाणी पुरवठा व तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदी 3 कोटी 25 लाख, अशुध्द पाणी आकार 4 कोटी, विविध वाहने खरेदी 1 कोटी, नविन रस्ते 500 कोटी, रस्ते दुरुस्ती 4 कोटी, इमारत दुरुस्ती 55 लाख, शहरातील ओढ नाले साफसफाई 45 लाख, आपत्कालीन व्यवस्थापन 50 लाख, कोडवाड्यावरील खर्च 12 लाख, वृक्षारोपण तदनुषंगिक खर्च 1 कोटी 35 लाख, हिवताप प्रतिबंधक योजना 60 लाख, कचरा डेपो सुधारणा व प्रकल्प उभारणी 21 लाख, मोकाट कुत्री व जनावरे बंदोबस्त 1 कोटी 30 लाख, मालमत्ता सर्वेक्षण 20 कोटी, मृत जनावरे विल्हेवाट प्रकल्प 20 लाख, पुतळे बसविणे 2 कोटी, भविष्य निर्वाह निधी तूट 5 कोटी, बेवारस प्रेत विल्हेवाट 55 लाख, उद्यान दुरुस्ती 15 लाख अशा बाबींबर खर्च अपेक्षित आहे.