नगर अर्बन सहकारी बँकेच्या कर्ज गैरव्यवहार व आर्थिक घोटाळ्यातील कर्ज मंजुरीसाठी बँकेच्या संचालकाने स्वीकारलेल्या रकमेतून भूखंड विकत घेऊन तो पत्नीला बक्षीस देण्याचा प्रकार पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. बँकेच्या गुन्ह्यात अटकेत असलेले माजी संचालक मनेष दशरथ साठे व अनिल चंदुलाल कोठारी या दोघांच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत (दि. ५) वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने आज, शुक्रवारी दिला.
अटकेतील आणखी एक आरोपी व बँकेचे माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांच्या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपत आहे. नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बँकेचे माजी संचालक अनिल कोठारी (६५) व मनेष साठे (५६) यांना अटक केल्यावर न्यायालयाने त्यांना आजपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. दोघांना आज तपासी पोलीस अधिकारी तथा आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक हरीश खेडकर यांनी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासाची माहिती दिली. सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी युक्तिवाद केला.
कर्जदारांच्या खात्यातून या दोघांच्या खात्यात पैसे वर्ग झाल्याचे फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झाले असून, या पैशांतून त्यांनी मालमत्ता खरेदी केल्याचे आढळले. याबाबत अधिक तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी वाढवण्याची मागितली. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार ‘फॉरेन्सिक ऑडीट’मध्ये आरोपी मनेष साठे याच्या अर्बन बँकेतील खात्यात २ एप्रिल २०१६ रोजी ६ लाख रुपयांचे झालेले व्यवहार संशयास्पद आहेत. ६ लाखांतून साठे याने कामरगाव शिवारात (ता. नगर) येथील गट नं. ९५ मधील १ हेक्टर ८८ आर शेतजमीन खरेदी केली. तसेच गैरव्यवहारातील रकमेतून खरेदी केलेल्या मालमत्तेबाबत कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी त्याने ही शेतजमीन दुय्यम निबंधकांकडे त्याची पत्नी व माजी नगरसेविका नंदा मनेष साठे हिच्या नावावर बक्षीसपत्र केली. याप्रकारे साठे याने इतर काही मालमत्ता खरेदी केली आहे काय, याबाबत त्याच्याकडे तपास करायचा आहे.