अर्बन बँक प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्कालीन सहाय्यक मुख्य व्यवस्थापक मनोज वसंतलाल फिरोदिया व प्रवीण सुरेश लहारे यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.फिरोदिया व लहारे या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. फिरोदिया याने कुवत नसतानाही तारण मालमत्तांचे वाढीव मूल्यांकन करत कमाल मयदिचे कर्ज मंजूर करण्याची शिफारस केली. तसेच, लहारे याने ३ कोटींचे कर्ज घेऊन मनोज वासुमल मोतीयानी याच्या खात्यात वर्ग केल्याचे व त्यातून जागा खरेदी झाल्याचा दावा आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात केला. संशयित आरोपी फिरोदिया याने संगनमत करून गुन्हा केलेला आहे. यात २९१ कोटींचा अपहार झाला आहे. फिरोदिया कर्ज अर्ज छाननी विभागात सहायक प्रमुख व्यवस्थापक या जबाबदार पदावरकाम करत असताना त्याने कर्जदारांची कुवत नसताना, कर्जाकरीता तारण मालमत्तांचे वाढीव दराचे मूल्यांकन अहवाल घेऊन त्यांना कर्ज मंजूर करण्याची शिफारस केलेली आहे. अपहार कालावधीत फिरोदिया याच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात रोख रकमा जमा करण्यात आल्या आहेत. याबाबत त्याच्याकडे तपास करायचा आहे.
तसेच आरोपी लहारे याने त्याच्या नावे बँकेत व्यवसायाकरीता ३ कोटी रूपये कर्ज घेतले. ही पूर्ण कर्ज रक्कम मनोज वासुमल मोतीयानी याच्या बँक खात्यात वर्ग केली. या कर्ज रकमेतून मोतीयानी याने खरेदी केलेली मालमत्ता ही या कर्जास तारण ठेवल्याचे समोर आले आहे. तसेच कोणतीही मालमत्ता तारण न घेता कर्ज मंजूर केले व मोतीयानी याने खरेदी केलेली मालमत्ता ही नंतर या कर्जास तारण ठेवण्यात आली. याच्या तपासासाठी १० दिवस पोलीस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद न्यायालयात झाला.