अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणारे नीलेश लंके महत्वाकांक्षी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यावर लंके आधी दुसऱ्या गटात गेले व नंतर पुन्हा अजित दादा गटात आले आणि उमेदवारीसाठी पुन्हा तिकडे गेले. अजितदादांनी समजावून सांगूनही त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे अजितदादांनी त्यांच्यावर काय अन्याय केला, हे त्यांनी जनतेला सांगावे, असे आव्हान राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी लंके यांना दिले. लंके यांनी आमदारकीचा आधीच राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीने त्यांना पक्षातून काढून टाकले नाही. मात्र त्यांनी पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला की नाही याची माहिती नाही, असे म्हणत नहाटा यांनी नवीन मुद्दा उपस्थित केला आहे.
नहाटा म्हणाले, अजितदादा पवारांनी पारनेर मतदारसंघाच्या विकासासाठी साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी दिला. त्यांच्यावर अजित दादांनी कोणताही अन्याय केला नाही. मात्र खासदार होण्याच्या महत्त्वाकांक्षेने त्यांनी दुसऱ्या गटाकडून उमेदवारी केली आहे. अजितदादांनी त्यांना समजावून सांगूनही त्यांचे त्यांनी ऐकले नाही. विखेंनी त्रास दिल्याचे लंके सांगतात. मात्र, विखेंनी त्यांना त्रास दिल्याचे एखादे उदाहरण पुराव्यानिशी त्यांनी द्यावे.