भाजपा सरकारला खाजगीकरण करत, सर्व शासकीय आणि महत्त्वाच्या न्यायव्यवस्था खिशात घालण्याचे डोहाळे – अभिषेक कळमकर. नगर (प्रतिनिधी)- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांविषयी अतिशय अशोभनीय वक्तव्य अहमदनगर शहरामध्ये दौऱ्याच्या दरम्यान केले. अशा प्रकारची ऑडिओ क्लिप संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. आपला देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही न्यायव्यवस्था असलेला देश आहे. लोकशाही ही कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका व पत्रकारिता या चार स्तंभावर आधारित आहे. यातील कुठलाही एक स्तंभ योग्य निर्णय घेण्यात चुकला तर संपूर्ण देशाची लोकशाही धोक्यात येत असते.यात पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आणि अतिशय महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून ओळखला जातो. ज्या ज्या वेळी राजकीय न्यायव्यवस्था ही सर्वसामान्यांना न्याय देण्यापेक्षा स्वतःचे हितगुज करू पाहते,तसेच लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करते त्यावेळी हाच लोकशाहीचा चौथा स्तंभ सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून, समाजाला जागृत करून शासनावर नियंत्रण ठेवण्याचे काम करत असतो. महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारच्या विरोधात आजचे संपूर्ण राजकीय वातावरण आहे. आरक्षणाचा गळा दाबून राबवत असलेले कंत्राटी शासकीय धोरण, शेतकरी विरोधी धोरण,स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजात,जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपा सरकार करत असल्याने त्यांच्या विरोधात जनतेच्या मनातील रोष आहे. लोकशाही विरोधातील राबवत असलेली धोरणे आपल्या प्रखर आणि निर्भीड लेखणीने महाराष्ट्रातील अनेक पत्रकार बांधव हे समाजासमोर मांडून,समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या लोकसभा आणि वेगवेगळ्या महत्त्वाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपा सरकारचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अहमदनगर शहराच्या दौऱ्यावर आले असता,त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये आपल्या भागातील गटातील सर्व पत्रकारांना धाब्यावर, हॉटेलवर जेवण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारचा चहा पीण्यासाठी महिन्याला मुद्दामून घेऊन जात जा,जेणेकरून ते आपल्या विरोधात काही छापणार नाही आणि काही पैशाची मदत लागली तर आम्ही व नगरचे दक्षिणचे खासदार भक्कम आहेत. असा आदेश दिला त्यामुळे आपल्या निपक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याऱ्या आणि राजकीय व्यवस्थेला भानावर आणणाऱ्या पत्रकारितेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने आणि खाजगीकरण करत सर्व शासकीय आणि महत्त्वाच्या न्यायव्यवस्था खिशात घालण्याचे डोहाळे लागलेल्या भाजपा सरकारचा व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अहमदनगर शहराच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी माजी महापौर व राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर. समवेत युवक शहर अध्यक्ष प्रकाश पोटे, उमेश भांबरकर, चैतन्य ससे, सागर शहाणे, अभिषेक जगताप, शैलेश सोनाग्रा आदी उपस्थित होते.