संत ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प आराखडा त्वरित सादर करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अहमदनगर, दि.१८- नेवासे येथे उभारण्यात येणाऱ्या संत ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प आराखडा आणि अहिल्यादेवी स्मारकाच्या जागेबाबत प्रस्ताव त्वरित सादर करावा, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात संत ज्ञानेश्वर सृष्टी विकास आराखडा आणि अहिल्यादेवी स्मारकाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे,उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, संत ज्ञानेश्वर सृष्टीचे काम पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर टिकणारे आणि भूकंपरोधक असावे. या सृष्टीच्या भव्यतेसोबत भेट देणाऱ्याला अध्यात्मिक वातावरणाचा अनुभव येईल अशी रचना असावी. मुख्यमंत्री महोदयांकडे या विकास आराखड्याचे सादरीकरण लवकरच करण्यात येईल. नेवासाचे स्थान महात्म्य देशभरात पोहोचविणारे हे स्मारक असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक देशातील उत्तम स्मारकांपैकी एक असेल असा आराखडा तयार करावा. स्मारकाच्या ठिकाणी महिला सक्षमीकरण केंद्र असावे. महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीने विविध प्रशिक्षण, अभ्यासक्रम आदींची सुविधा येथे असावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
यावेळी संत ज्ञानेश्वर सृष्टी आणि अहिल्यादेवी स्मारकाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.
अहमदनगर – शिर्डी रस्त्याच्या कामाचा आढावा
पालकमंत्री विखे पाटील यांनी अहमदनगर – शिर्डी रस्त्याच्या कामाचाही आढावा घेतला. रस्त्याची कामे करतांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ट्रॅफिक वॉर्डन नेमावे. अजूनही महामार्गावरील खड्डे दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही, ते त्वरित करावे, असे निर्देश त्यांनी दिले.