अहमदनगर-मागील भांडणाच्या कारणावरुन तरुणाच्या पोटात मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खडका येथे घडली असून याबाबत मयत तरुणाच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत भाऊसाहेब परभत नेमाणे, मूळ रा. शिरेसायगाव, ता. गंगापूर हल्ली रा. खडकाफाटा ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 31 जुलै रोजी मुलगा शरद नेमाणे हा सायंकाळी साडेपाच वाजता घरासमोर उलट्या करत असताना दिसला.
त्याला त्याबाबत विचारले असता सकाळी साडेअकरा वाजता अमोल खेमनर याच्या शेतात गेलो असता मागील मारहाणीच्या कारणावरून अमोल किसन खेमनर, वच्छलाबाई किसन खेमनर व किसन खेमनर यांनी शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्क्याने पोटात मारहाण केली असल्याचे सांगितले. मुलगा शरद यास पोटदुखी व उलट्याचा त्रास होत असल्याने माझी पत्नी सुशीलाबाई ही मुलगा शरद यास नेवाशातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेली. त्यानंतर दुसर्या दिवशी मुलगा शरद याचा त्रास वाढतच गेला त्यास सरकारी रुग्णालयात दाखल केले असता अडीच वाजता त्यास मयत घोषित केले. या फिर्यादीवरून अमोल किसन खेमनर, वच्छलाबाई किसन खेमनर व किसन खेमनर यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 115(2), 351(2) व 352 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.