Monday, September 16, 2024

Ahmednagar-News डिजिटल जात प्रमाणपत्र व उत्पन्न दाखल्यात फेरफार प्रकरणी सेतूचालकांविरूध्द गुन्हे दाखल..

*डिजिटल जात प्रमाणपत्र व उत्पन्न दाखल्यात फेरफार प्रकरणी सेतूचालकांविरूध्द गुन्हे दाखल*

*शिर्डी व कोपरगाव पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा*

*डिजिटल प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करून घेण्याचे शिर्डी उपविभागीय अधिकारी यांचे आवाहन*

*शिर्डी, -* महाऑनलाईन प्रणालीद्वारा वितरित डिजिटल जात प्रमाणपत्रात फेरफार केल्याप्रकरणी एका सेतू चालकावर शिर्डी पोलीस ठाण्यात व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांसाठी जोडलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रात फेरफार केल्याप्रकरणी तिघांविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिर्डी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून महाऑनलाईन प्रणालीद्वारा डिजिटल जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येते. डिजिटल वितरीत करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रामध्ये फेरफार करून अनधिकृत खोटा दाखला वितरीत केल्या प्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशन येथे सेतूचालक विशाल नागेश दवंगे (रा. कोपरगाव) यांचेविरूध्द भा.द.वि. कलम ४२०, ४०६, ४६५, ४६६, ४६७, ४६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय अधिकारी कार्यालय शिर्डी यांचेकडे प्राप्त नॉन क्रिमिलेअर प्रस्तावासमवेत सादर करण्यात आलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रांमध्ये फेरफार करण्यात आलेला असल्याची बाब नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र तपासणी करताना निदर्शनास आल्याने त्याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश कोपरगाव निवासी नायब तहसीलदार यांना देण्यात आले होते. त्यानुसार पडताळणी करता उत्पन्न दाखले देखील बनावट वितरीत करण्यात आल्याची बाब निदर्शनास आल्याने तत्काळ गुन्हा दाखल करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले होते. त्यानुसार कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे सेतूचालक विश्वेश्वर द्वारकानाथ बागले (रा. कोपरगाव) आतिष भाऊसाहेब गवळी (रा. मढी ता. कोपरगाव) व सुनिल लक्ष्मण शिंदे (रा. काकडी ता. कोपरगाव) यांचेविरूध्द भा.द.वि. कलम ४२०, ४०६, ४६५, ४६६,४६७,४६८,४७१ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या गुन्ह्यांमध्ये अधिकारी यांचे नावाचा व पदनामाचा गैरवापर, मुळ दस्ताऐवजमध्ये खाडाखोड करून खोटे दस्ताऐवज तयार करणे, शासनाची दिशाभूल करणे, राजमुद्रेचा गैरवापर करणे, शासकीय लोगोचा गैरवापर करणे, शासनाची प्रतिमा मलिन करणे अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत.

नागरिकांनी फसवणूक टाळण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय शिर्डी व राहाता व कोपरगाव तहसील कार्यालयाकडून प्राप्त होणाऱ्या डिजिटल दाखल्यांची पडताळणी https://revenue.mahaonline.gov.in/Verify/ व https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या संकेतस्थळावर प्रमाणपत्रांचा बारकोड टाकून करून घ्यावी.असे आवाहन शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.
००००००००

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles