दर्पण दिनानिमित्त केडगाव प्रेस क्लबतर्फे स्नेहमेळावा संपन्न
जीवनाच्या यशाची सुरुवात वाचनातून – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
नगर – मोबाईलमुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. अलीकडच्या काळात वाचन कमी होत आहे. शालेय जीवनातील शिक्षण घेताना मुलांनी वाचन संस्कृती वाढवली पाहिजे. कारण यशाची सुरुवात वाचन संस्कृतीतूनच होते. त्यामुळे मुलांनी वाचनाकडे वळावे. यासाठी आता पालकांच्या प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
केडगाव प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सालीमठ बोलत होते. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, कोतवाली पोलीस स्टेशनचे पो. नि चंद्रशेखर यादव, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सचिव मन्सूर शेख, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, ‘मायकेअर’चे ऋषिकेश गाडीलकर, केदार गाडीलकर, बाजार समितीचे संचालक संतोष म्हस्के, सुरेखा कोतकर, वैशाली कोतकर, जि. प. सदस्य सचिन जगताप, भूषण गुंड, मुबारक सय्यद, समीर मन्यार, बबन मेहेत्रे, भूषण देशमुख, मिलिंद बेंडाळे, रवींद्र देशपांडे, जयंत कुलकर्णी, नितीन देशमुख, प्रफुल्ल मुथा, संजय गाडीलकर, अनिल हिवाळे, विजय मुळे, मुरलीधर तांबडे, विक्रम लोखंडे, रामदास बेंद्रे, ओंकार देशपांडे यांच्यासह क्लबचे सर्व सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी आदर्श पत्रकारिता पुरस्कारप्राप्त भूषण देशमुख, दत्ता इंगळे व सूर्यकांत वरकड यांचा सन्मान करण्यात आला.
श्री. सालीमठ पुढे म्हणाले की, पत्रकारिता समाजाला दिशा देते. अलीकडे धावपळीच्या जीवनात वाचन कमी होत आहे. मुळात प्रगल्भपणे पत्रकारिता करायची असेल, सामाजिक जीवनातील घटकांची मांडणी करण्यासाठी अभ्यास व वाचन महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने वाचन केले जात नाही. तरुण, शाळकरी मुले मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. याचे दुष्परिणाम दिसताहेत. यशाची सुरुवात वाचनातून होते. त्यामुळे वाचन संस्कृती वाढायला हवी. मुलांनी वाचन करण्याची जबाबदारी पालकांची आहे. पालकांनी मुलांना वाचनाची आवड निर्माण करावी, असे ते म्हणाले.
आयुक्त डॉ. पंकज जावळे म्हणाले की, पत्रकार समाजाचा कणा आहे. समाज सुधारण्याची ताकद लेखणीत असते. पत्रकार हे नेहमी धावपळीत असतात. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविकात रवींद्र देशपांडे यांनी केडगाव प्रेस क्लबच्या आतापर्यंतच्या वाटचाल विशद केली. याप्रसंगी श्री. यादव व श्री. नेटके यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दिवंगत पत्रकार महेंद्र कुलकर्णी व गोरक्ष पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सूत्रसंचालन अविनाश कराळे यांनी केले, आभार रवींद्र देशपांडे यांनी मानले.
जीवनाच्या यशाची सुरुवात वाचनातून – जिल्हाधिकारी सालीमठ,केडगाव प्रेस क्लबतर्फे स्नेहमेळावा
- Advertisement -