श्रीगोंदे – प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एकाच कुटुंबातील चौघे पोलिस दलात भरती झाले आहेत. कर्जत तालुक्यातील सुपा येथील मोटे कुटुंबीयाची ही यशोगाथा आहे. मुलगी सोनाली, रुपाली, रोहिणी आणि मुलगा ज्ञानेश्वर याने यश मिळवले.
सुपा (कर्जत) गावातील रहिवाशी असलेले अंकुशराव मोटे यांचे कुटुंब वर्षानुवर्षे प्रतिकुल परिस्थितीशी झुंज देत होते. दुष्काळी परिस्थितीमुळे शेती बेभरवशाची. अशा परिस्थितीत अंकुशराव यांनी मिळेल ते काम करून प्रपंच चालवला. तीन मुली व एक मुलगा.चौघांच्या शिक्षणासाठी अंकुशराव यांनी जीवाचे रान केले. पत्नी कमलबाई यांनी मोलाची साथ दिली. मुलगी सोनाली, रुपाली, रोहिणी व मुलगा ज्ञानेश्वर यांना आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव होती. चौघांनीही पोलिस सेवेत जाण्याचा निश्चय केला. २०१२ मध्ये सोनाली पोलिस सेवेत रुजू झाल्या. सध्या त्या बारामती ग्रामीणमध्ये कार्यरत आहेत.
२०१७ मध्ये रुपाली आणि रोहिणी या दोघी पोलिस सेवेत भरती झाल्या. रूपाली श्रीगोंदा येथे, तर रोहिणी मुंबई शहर येथे कार्यरत आहेत. ज्ञानेश्वर भरतीसाठी प्रयत्नशील होता. मात्र, यश येत नव्हते. त्याने हार मानली नाही. नुकताच पोलिस भरतीचा निकालात ज्ञानेश्वर भरती झाला.
आई-वडिलांनी मोठे कष्ट घेतले. घरात शिक्षणाचा कसलाही गंध नसताना आम्हाला शिकवले. आम्ही त्यांचे कष्ट पाहिले अन् त्यातूनच आम्हाला स्वतःला घडविण्याची प्रेरणा मिळाली.
– रुपाली मोटे, श्रीगोंदे पोलिस स्टेशन