नगर : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले. सप्टेंबर महिन्याचा हप्तादेखील लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे. परंतु दिवसरात्र एक करून लाडक्या बहिणींचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मात्र अजून एक पैसाही मिळालेला नाही. अहमदनगर जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक अंगणवाडी सेविका प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित आहेत.
फक्त अंगणवाडी सेविकांनाच लाडक्या बहिणींचे अर्ज भरून घेण्याची परवानगी दिली आहे. मात्र त्यांना प्रत्यक्षात एकही रुपया मिळालेला नाही.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. तेव्हा लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यासाठी आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका यासह ११ जणांना प्राधिकृत केले होते. परंतु ६ सप्टेंबरला एका नव्या आदेशाद्वारे फक्त अंगणवाडी सेविकांनाच या योजनेतील महिलांचे अर्ज भरून घेण्याची परवानगी दिली आहे.
जिल्ह्यात ५ हजार ३७५ अंगणवाडी आहेत. यातील रिक्त जागा वगळता पाच हजार अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्यात मोठी भूमिका बजावली. प्रत्येक लाभार्थी महिलेसाठी अंगणवाडी सेविकेला ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार येईल, असे सरकारने जाहीर केले होते. तसेच महिलांना मेळाव्याला आणण्याची जबाबदारीही अंगणवाडी सेविकांवर देण्यात आली होती.