नगर तालुका खरेदी विक्री संघ तसेच जिल्हा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार व भिंगार अर्बन बँक निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार समारंभ सन्मान संपन्न झाला.
यावेळी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह माजी मंत्री तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, विनायकराव देशमुख, हरिभाऊ कर्डिले, रावसाहेब पाटील शेळके, अंकुश शेळके, अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, भिंगार बँकेचे चेअरमन अनिल झोडगे व नवनिर्वाचित सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विनायकराव देशमुख म्हणाले की, मागील 32 वर्ष काँग्रेसच्या व्यासपीठावर व आता पहिल्यांदाच भाजपाच्या व्यासपीठावरून मनोगत व्यक्त करतोय. अनेक वर्ष प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाचे कार्य करीत आले असून या काळात मला दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचे काम केले. विखे कुटुंबीयांच्या तीन पिढ्यांसोबत काम करण्याचा योग मला आला. विखेंनी ताकद दिल्यानेच जिल्ह्यातील राजकारणात टिकून राहिलो. विखे कुटुंबीयांनी कायम सर्वसामान्यांचा सन्मान केला. हा सर्व प्रवास पूर्ण करून मी पुन्हा मूळ टप्प्यात आलो आहे. कारण माझ्या जीवनाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत झाली असून आता आयुष्याच्या शेवट टप्प्यात पुन्हा मी भारतीय जनता पार्टीत आलोय. भाजपामधील अनेक नेते मंडळीसोबत माझा कायम स्नेह राहिला आहे. आता विखे आणि माझे नेते अशोक चव्हाण एकाच विचारसरणीत आल्याने मोठा आधार झाला आहे. ज्या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री पदाचे अनेक उमेदवार असायचे त्या जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून काम करण्याचे मला संधी मिळाली. स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे ऋण मी आयुष्यभर विसरू शकत नाही. मी पुन्हा एकदा घरामध्ये आल्याचा अनुभव आला आहे.